भंडारा : “निवडणूक लढविण्यासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी पैशानेच निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे कोणीही स्वतःला बाहुबली समजू नये, असा सूचक इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी कोणाचे नाव न घेता दिला. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
प्रफुल पटेल म्हणाले, त्यांनी लोकांशी संवाद साधावा आणि मजबूत उमेदवारांवर भर द्यावा, आपल्याला इतरांची चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असल्याने इतरांनीच त्यांची चिंता करावी, असं उपरोधक टोलाही त्यांनी लगावला.
भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे महायुतीचे तीन घटक आहेत. नगरपालिका निवडणुका पक्षातील नेते स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. भाजप अनेक नगरपालिकांत स्वबळावर लढत असून, मित्रपक्षांच्या नेत्यांना तोडत स्वतंत्र आघाड्या तयार करीत आहे.
भंडाऱ्यात प्रफुल पटेल यांनी कोणाचे नाव न घेता भाजपला सूचक इशारा दिला, की राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असून इतरांनीच त्यांची चिंता करावी. पटेल यांनी सांगितले की निवडणूक पैसे जिंकवत नाही, मेहनत आणि जनसंपर्कच निर्णायक असतात; महायुतीत राहूनही राष्ट्रवादी आपले स्वतंत्र अस्तित्व राखते. बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये अति आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बिहारच्या निकालापूर्वीच भाजपने राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक ठिकाणी मित्रपक्षाच्या नेत्यांना फोडून त्यांच्यासमोरच आव्हान उभे केले जात आहे. मात्र, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने आता नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच नाव न घेता भाजपला सुनावल्याचे मानले जात आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी मित्रपक्ष भाजपला इशारा दिल्याचे मानले जात आहे. आता भाजपकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.
आपण निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम आहेत. इतरांना आपली चिंता करावी लागेल, आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे म्हणून ते निवडून येणार आहेत. कुणी काय आहेत. किती बाहुबली लोकांना आम्ही मागच्या काळात निवडून दिलं आहे, हे आम्हाला माहिती आहे, असे पटेल म्हणाले. निवडणुकीत पैसे लागतात, ते एक माध्यम आहे. पण पैशामुळे निवडणूक जिंकून आलो आहे, असं वाटत असेल तर तसं होत नाही.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान मिळविण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाण्याचे नियोजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे. घरी बसून मतदान होत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल, असा सल्लाही पटेलांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहु-फुले- आंबेडकर यांच्या विचारधारेने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे महायुतीमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्वतंत्र अस्तित्व राखलेले आहे. आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आपल्या सर्वांनी अधिकची मेहनत घ्यावी लागेल, असेही त्यांनी पक्षाच्या पदधिकाऱ्यांना सांगितले.
