भंडारा : नवीन सुधारित मोटार वाहन कायद्याचा उद्देश रुग्णांचा जीव वाचवणे हा असला तरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिका सेवेच्या दयनीय स्थितीकडे पाहिल्यास ते शक्य वाटत नाही. अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) कालबाह्य झालेल्या “अनफिट” रुग्णवाहिका आता शहरांतील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. भंडाऱ्यातील अशा पाच रुग्णवाहिकांवर वाहतूक विभागाने दंडुका उगारला असून पाचपैकी तीन रुग्णवाहिका या शासकीय आहेत. मात्र फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यानंतरही या रुग्णवाहिकाना रुग्णसेवेसाठी कसे पाठविले जाते, रुग्णवाहिका देखभाल दुरुस्ती वेळोवेळी केली जात नाही का, यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात तावसी गावाजवळ एका धावत्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने चालक आणि डॉक्टर वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागही खळबळून जागे झाले आणि खाजगी सोबतच शासकीय रुग्णवाहिकांच्याही तपासणीचा सपाटा सुरू केला.
जिल्ह्यात शेकडो खाजगी रुग्णवाहिका तसेच १०८ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिका रुग्णसेवेत आहेत. खेड्यापाड्यासह शहरी भागातील रुग्णांना काही मिनिटात सेवा देणाऱ्या ‘१०८’ रुग्णवाहिकांचे आयुर्मान संपल्यानंतर त्या रुग्णांसाठी धोकादायकही ठरतात. रुग्णसेवेचा महत्त्वाच्या अंगापैकी एक असलेल्या रुग्णवाहिकेची तांत्रिक तपासणी वेळोवेळी करणेही महत्त्वाचे असते. जेणेकरून या रुग्णवाहिकेचा अपघात टळू शकतो. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य विभागाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अनफिट झालेल्या रुग्णवाहिकांची तपासणी न करता किंवा त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न देता अनफिट रुग्णवाहिका सर्रास रुग्णांना घेऊन धावत आहेत. अशाच तीन शासकीय रुग्णवाहिकांवर आरटीओने दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या तीन शासकीय रुग्णवाहिकांपैकी दोन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तर एक जिल्हा आरोग्य विभागाच्या कोंढा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आहे.
सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी सांगितले की, फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर ५ रुग्णवाहिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात दोन खाजगी तर तीन शासकीय रुग्णवाहिका आहेत. १६ ते २१ जून दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या त्रुटीनुसार प्रत्येकी ६ हजार, १० हजार ५०० आणि १२ हजार ५०० असा तीन शासकीय रुग्णवाहिकांना दंड आकारण्यात आला. तर २२ हजार ७५० आणि १८ हजार ७०० असा दंड दोन खासगी रुग्णवाहिकांवर आकारला आहे. या तीनही रुग्णवाहिका सध्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका आता रुग्णांना बसत आहे.
दरम्यान, या शासकीय रुग्णवाहिकांची फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण प्रक्रिया वेळच्या वेळी का करण्यात आली नाही, यांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट कुणाला देण्यात आले आहे असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागाचा दुर्लक्षित धोरणामुळे तीन रुग्णवाहिकांच्या भुर्दंड नाहक शासनाच्या तिजोरीवर बसला आहे. संबंधित वाहनांची त्वरित तपासणी करण्याच्या सूचना भंडारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
…. तर जबाबदार कोण ?
अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. मात्र एखादी अनफिट रुग्णवाहिका अपघातग्रस्त झाली, तर या अपघातास कोण जबाबदार राहणार, रुग्णवाहिकेची देखभाल करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते या अपघातासाठी जबाबदार असतील. जिल्हा रुग्णालय किंवा आरोग्य विभाग या यंत्रणांनी रुग्णवाहिकेची तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक आहे, ती यंत्रणा देखील जबाबदार असू शकते. जर त्यांनी निष्काळजीपणे काम केले आणि त्यामुळे अपघात झाला, तर त्यांना देखील जबाबदार धरले जाईल.
प्रतिक्रिया..
आमच्याकडे रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. केवळ ६ रुग्णवाहिकांवर सगळा भार आहे. फिटनेस करीता ऑनलाइन प्रक्रियेत ओटीपीची गरज असते. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. आमच्या दोन रुग्णवाहिकांवर वाहतूक विभागाने दंड ठोठावला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली असून दंड भरण्याची मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे. – डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा