भंडारा : आजवर लहान मोठे प्राणी शहरात येत असल्याचे ऐकीवात होते. मात्र, काल २९ जुलै रोजी भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे दिसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान परिसरातील दोन शेतकऱ्यांनी जनावराच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच ते त्या दिशेने धावत आले आणि जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने वाघाने तेथून पळ काढला. स्वतःच्या पाळीव जनावराला वाचविण्यासाठी या दोन शेतकऱ्यानी मोठ्या हिमतीने वाघाला पळवून लावले. मात्र या प्रकारानंतर कालपासून गणेशपूर येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या व भंडारा शहराचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या गणेशपूर येथील नवीन स्मशानभूमी परिसरात काल वाघाचे ठसे दिसल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. गणेशपुर स्मशानभूमी परिसर आणि ऑफिसर क्लब भंडाराच्या मागील बाजूला असलेल्या नदी काठावर वाघाचा संचार असल्याचे सांगण्यात येते. काल २९ जुलै रोजी गणेशपुर येथे राहणारे सुरेश बडवाईक आणि कांबळे हे त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी स्मशानभूमी परिसरात घेऊन गेले. दोघेही आडोशाला बसलेले असताना त्यांना त्यांच्या बकऱ्याचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच दोघेही आवाजाच्या दिशेने धावत सुटले. त्याच वेळी त्याचा एक बकरा गंभीर जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोघांनीही एकच आरडाओरड केली, त्यांच्या आवाजाने वाघाने तेथून धूम ठोकली आणि नदीच्या दिशेला पळाला.
हेही वाचा : “हरलो तरी बेहत्तर, पण महायुतीला ताकद दाखवूनच देणार”, मित्रपक्षाच्याच नेत्याने ठोकला शड्डू
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने परिसरात चिखल झाला आहे त्यामुळे वाघाच्या पाऊलखुणा त्यावर स्पष्ट उमटल्या. गणेशपुरचे शेतकरी कैलाश बडवाईक व सुनील साकोरे यांना त्या पाऊलखुणा दिसल्या. त्यांनी लगेच गणेशपुर जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांना फोन केला आणि गणेशपुर स्मशानभूमी मार्गावर वाघाचे ठसे दिसत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच सोनकुसरे गावकऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे वाघाचे पंजे पाहताच सगळ्यांचे धाबे दणाणले. त्याच दरम्यान ३०० ते ४०० मीटर अंतरावर वाघाने सुरेश बडवाईक यांच्या मोठ्या बकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचे लक्षात आले. त्या वेळी तेथे असलेले सुरेश बडवाईक व कांबळे यांनी त्या वाघाला हुसकावून लावत आपल्या पाळीव जबावराचा जीव वाचवल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. सहाय्यक वन संरक्षक सचिन निलक यांच्यासह वन विभागाचे पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाची संपूर्ण चमु घटनास्थळी दाखल होताच संपूर्ण परिसर पिंजून काढला. घटनास्थळाची सुद्धा पाहणी करण्यात आली. जखमी झालेल्या बकऱ्याचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी सदर वाघाच्या हालचाली ट्रेस करण्याकरिता संपूर्ण परिसरात ट्रॅक कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी यशवंत सोनकुसरे यांच्यासह गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली.
हेही वाचा : नागपुरातील शाळांसमोर जीवघेणी वाहतूक…ना व्यवस्थापनाला चिंता, ना पोलिसांना काळजी…
गणेशपूर हा भंडारा शहरा लगतचा भाग असल्यामुळे सर्व लोक या भागात मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करीत येतात. मात्र सध्या दोन ते चार दिवस त्या भागात जाणं टाळावे , ज्यामुळे कुठलीही अनुचीत घटना होण्याची शक्यता टाळता येईल. सर्वांनी सतर्क राहावे सर्वांनी सुरक्षित रहावे असे आवाहन यशवंत सोनकुसरे यांनी नागरिकांना केले आहे.
वाघिण असल्याचा अंदाज…
नदीच्या त्या पलीकडे असलेल्या गराडा वन परिक्षेत्रात बीटी १० या वाघिणीचा संचार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे कदाचित ही तिच वाघीण असावी असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी शोधकार्यात लागले असून ज्या भागात ठसे आढळले तेथे रात्रभर गस्त वाढविला असल्याचे सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : गडचिरोलीवर घोंगावणारे महापुराचे संकट टळले? मेडिगड्डाचे ८५ दरवाजे उघडे असल्याने थेट तेलंगणा सरकारला…
२०२१ मध्येही दिसले होते ठसे..
गणेशपूर येथील नवीन स्मशानभूमित आणि पिंडकेपार येथे असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकी जवळ ओल्या जमिनीवर १३ फेब्रुवारी २०२१ रोजीही काही लोकांना वाघाच्या पायाचे ठसे आढळले होते. याबाबत गणेशपूर येथील यशवंत सोनकुसरे यांनीउपवनसरंक्षकांना माहिती दिली होती. माहितीच्या आधारे उपवनसंरक्षकांनी वनविभागाचे एक पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली असता वाघ येऊन गेल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे पुढे आले होते.