भंडारा : वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. लाखनी तालुक्यातील केसलवाडा गराडा शेतशिवाराजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. २९ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून श्रीकांत माधव हटवार असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरमाडी/सावरी येथील रहिवासी श्रीकांत याचा लाखनी येथील आनंद टेंभुर्णे ( ४०) याच्या सोबत वाद होता. त्यांच्यात अनेकदा जोरदार भांडणेही झाली होती. त्याबाबतची तक्रार लाखनी पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांचे वैरी झाले होते. याच वैमनस्यातून आरोपी आनंद याने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना हाताशी धरून श्रीकांतची हत्या करण्याचा कट रचला.

हेही वाचा…आमदार संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज शिंदे गटाचा ‘मास्टर स्ट्रोक’, भाजपावर दबावतंत्राचा…

काल संधी साधून त्यांनी श्रीकांतची हत्या केली व मृतदेहाला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सचिन हटवार याच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवी कलम ३०२ , २०१ व १२० बी अंतर्गत गुन्हा नोंद केला. गुन्हयातील आरोपी आनंद टेंभुर्णे याला सकाळी अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.