बुलढाणा: मुलाचे गुण वाढवून देण्याचे आणि शैक्षणिक प्रगतीचे आमिष दाखवून विध्यार्थ्याच्या आईवर दोघा शिक्षकांनी शारीरिक अत्याचार केला होता. या प्रकरणातील दोन आरोपी शिक्षकांना शाळा व्यवस्थापनाने सेवेतून निलंबीत केले आहे.

मलकापूर येथील लोकसेवा शिक्षण बहूउद्देशिय मंडळद्वारा संचालित नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे मुख्याध्यापकानी ही कारवाई केली. समाधान आत्माराम इंगळे आणि अनिल थाटे अशी आरोपी व निलंबीत करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. हे दोघे नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या दोघांवर मागील २२ एप्रिल २०२५ रोजी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी समाधान इंगळे (वय ४५, राहणार मलकापूर) व अनिल थाटे (वय ४७ मलकापूर) या दोघा विरुद्ध गुन्हे दाखल केले . यातील इंगळे हा पीडितेच्या मुलाचा वर्ग शिक्षक आहे. दुसरा आरोपी त्याच शाळेत आहे. यामुळे पीडिता व आरोपी यांची ओळख झाली, फोनवरून बोलणे सुरु झाले.साळसूद पणाचा आव आणणाऱ्या या शिक्षकांनी “तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ व पहिला नंबर आणू, त्यासाठी तू आम्हाला खूश कर” असे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत नमूद होते.

आरोपींनी पीडितेला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत तिला जिवे मारण्याची धमकीही दिली.वेळोवेळी तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. हा घृणास्पद घटनाक्रम सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत मलकापूर येथे घडला . शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी शिक्षकांना २२ एप्रिल ते ७ मे दरम्यान १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली . ४८ तासापेक्षा जास्त काळ कोठडी मध्ये राहिल्याने त्यांचे निलंबन अपरिहार्य ठरले. शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यानी देखील परवानगी दिली. या घटनेने शाळेच्या प्रतिष्ठा, प्रतिमेवर वाईट परिणाम झाला. पालक व नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.