चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आणि जिल्हा काँग्रेस निवड मंडळाने शुक्रवारी जिल्ह्यातील दहा नगर पालिका व एक नगर पंचायत साठी मुलाखती घेतल्यानंतर रात्री उशिरा लगेच चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची उचलबांगडी करून प्रभारी शहर काँग्रेस अध्यक्ष पदी माजी नगरसेवक संतोष लहानगे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान तिवारी यांना अचानक अध्यक्ष पदावरून दूर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगर पालिका व नगर पंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. दहा नगर पालिका व एक नगर पंचायत साठी काँग्रेस निवड मंडळाने शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक ५५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखत कार्यक्रमाला काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे तथा इतर नेते उपस्थित होते. मात्र शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी या मुलाखत कार्यक्रमाला गैरहजर होते.
यावेळी काही पत्रकारांनी शहर अध्यक्ष गैरहजर असल्याबाबत काँग्रेस नेत्यांना विचारणा केली. मात्र निवड मंडळात ते नाही असे सांगून खरे उत्तर देण्याचे टाळले. मात्र सायंकाळी विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कडे प्रभारी शहर काँग्रेस अध्यक्ष पदी संतोष लहानगे यांच्या नियुक्तीचे पत्रच आले.
दरम्यान महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर अध्यक्ष बदल करून काँग्रेस पक्षाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली अशी भावना आता काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी बोलून दाखवित आहेत. महापालिका निवडणुकीनंतर शहर अध्यक्ष बदलला असता तर चालले असते, निवडणुकीला आता कसे समोर जायचे असाही प्रश्न अनेकाना आहे.
विशेष म्हणजे अतिशय शांत स्वभावाचे संतोष लहानगे शहर अध्यक्ष पदाला न्याय देऊ शकतील काय अशीही चर्चा आहे. तसेच २०१७ मध्ये महापौर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या ११ नगरसेवकांमध्ये लहामगे यांचाही समावेश होता. त्यामुळे भाजपशी कधीकाळी हातमिळवणी करणाऱ्याच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घालणं कितपत योग्य आहे असेही प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी प्रभारी शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
