चंद्रपूर : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे कॉग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर विठ्ठलाच्या साक्षीने एकत्र आले. खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत बँकेत कॉंग्रेसची सत्ता बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे विद्यमान संचालक शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घेण्याचा व विजय बावणेंना निवडून आणण्याचे ठरविण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी १० जुलै रोजी मतदान होत आहे. बँकेचे ११ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरीत दहा संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. बँकेच्या निवडणुकीत कालपर्यंत कॉंग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार व शिवसेना उठाबाचे रवींद्र शिंदे यांचा गट सक्रीय होता. मात्र आषाढी एकादशी व मोहरमच्या मुहूर्तावर बँकेच्या राजकारणातील चक्रे फिरली आणि विठ्ठलाच्या साक्षीने, आशिर्वादाने कॉंग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, बँकचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक संदिप गड्डमवार, उठाबाचे रवींद्र शिंदे तथा कॉंग्रेसचे बँकेतील सर्व संचालक एकत्र आले. या सर्वांनी आषाढी एकादशी निमित्त सकाळी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतले, जिल्हा कारागृहात मोहरम निमित्त दर्गा येथे माथा टेकला, त्यानंतर चर्च येथेही भेट दिली. त्यानंतर खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्हा बँकेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे कालपर्यंत एकमेकांना निवडणुकीच्या रणांगणात पाण्यात बघणारे आमदार विजय वडेट्टीवार व खासदार धानोरकर बँक निवडणुकीच्या निमित्ताने का होईना एकत्र आले. आज झालेल्या बैठकीत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे बंधू तथा बँकेचे विद्यमान संचालक व कोरपना तालुका अ गटातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घेवून न्यायालयीन लढाई जिंकणारे कॉंग्रेसचे पदाधिकारी विजय बावणे यांना निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चंद्रपूर तालुका अ गटातून बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, ओबीसी गटातून कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनाही निवडून आणण्याची व्युहरचना आखण्यात आली.
दरम्यान ओबीसी गटात कॉंग्रेस सेवादलाचे सुर्यकांत खनके हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांची अडचण झाली आहे. तर ब वर्ग गट २ मधून रोहित बोम्मावार, उमाकांत धांडे, किशोर ढुमणे या तिघांपैकी काहींनी ढुमणे यांना तर काहींनी बोम्मावार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सतरंजा उचलण्यापासून कॉंग्रेसचे काम करणारे धांडे या कट्टर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. तिकडे वरोरा (अ गट): जयंत टेमुर्डे, विजय देवतळे, वसंत विधाते यांच्या लढत होईल. भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग: पांडूरंग जाधव, दामोदर रुयाकर, यशवंत दिघोरे अशी लढत होणार आहे. कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्र आल्याने भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया व आमदार किशोर जोरगेवार काय काय भूमिका घेतात याकडे बँकेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बँकेतील या सर्व राजकीय घडामोडी मागील चोवीस तासात घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवारी खसदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपुरात कॉंग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यानंतरच वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात येवून खासदार धानोरकर यांच्या निवासस्थानी बैठकीला हजेरी लावली. या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याने विस्कळीत झालेल्या कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल अशी चर्चा आहे.