चंद्रपूर : विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सूरज संतोषसिंह कुंवर (२५) रा. अष्टभुजा वॉर्ड याची धारदार चाकूने हत्या करून पुरावा राहू नये म्हणून मृतदेह मनपाच्या डम्पिंग यॉर्डमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मृतक सूरजवर विविध ठाण्यात चोरीसह अन्य गंभीर गुन्हेही दाखल आहेत. तो परिसरातील नागरिकांना त्रास द्यायचा या कारणातून त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. पाचही जण सूरजचे मित्र आहेत. पोलिस सूत्रानुसार, शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी रात्री सूरज व त्यांचे मित्र एका ठिकाणी भेटले. दरम्यान, आपल्या मित्रांसमवेत ओली पार्टीही केली. यामध्ये सर्वांनी यथेच्छ दारू पिली. अशातच जुन्या वैमनस्यातून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एकाने सूरजच्या पाठीवर धारदार चाकूने वार केला. यामध्ये सूरज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. यानंतर पुन्हा त्याच चाकूने अनेकवार केले. यामध्ये सूरजचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा…अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात चार ठार, १० जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने पाचही जणांनी बाजूलाच असलेल्या महापालिकेच्या डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या खड्यात सूरजचा मृतदेह पुरला. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. मात्र, ही घटना लपून राहिली नाही. शनिवारी सकाळी या परिसरात काही नागरिकांना रक्ताचा सडा दिसून आला. यावरून संशय बळावला. या घटनेची माहिती त्यांनी रामनगर पोलिसांनी दिली. पोलिसांनी तत्काळ अष्टभुजा परिसर गाठले. रक्ताचे डाग डम्पिंग यार्डच्या दिशेने दिसत होते. त्या अनुषंगाने तपास केला असता ते कचऱ्याच्या खड्ड्यापर्यंत पोहोचले. तेथे सूरजचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी हत्येच्या संशयात पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी दिली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.