चंद्रपूर : माझ्याच मतदारसंघातील ८४० कोटींच्या दोन विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि मलाच मुख्य समारंभात भाषणाची संधी मिळाली नाही, अशा शब्दांत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री शिंदे तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याचबरोबर, जोरगेवार समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील अव्यवस्थेबद्दल समाज माध्यमावर टीका केल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर धुसफूस दिसून येत आहे.

हेही वाचा : सावधान! मूत्रपिंडाला सौंदर्य प्रसाधन क्रीममुळे धोका !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या १ हजार ६६७ काेटींपैकी निम्मी कामे ही आमदार जोरगेवार यांच्या मतदारसंघातील आहेत. मात्र या कार्यक्रमात जोरगेवार यांना महत्त्व दिले गेले नाही, असे प्रकर्षाने जाणवले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रास्ताविक केले. आमदार जोरगेवार यांना दोन मिनिटे भाषण करण्यास कार्यक्रमापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा व्यस्त दौरा पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचेच भाषण झाले. यामुळे जोरगेवार यांनी मुख्यमंत्री शिंदे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यापूर्वी देखील आमदार जोरगेवार यांनी अशीच नाराजी बोलून दाखवली होती. यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.