चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील शुभम बबन मानकर या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांच्या डोळ्यासमोर वाघाने तोंडात उचलून जंगलात नेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

सिंदेवाही तालुक्याच्या ठिकाणाहून जवळच असलेल्या गडबोरी या गावातील बबन मानकर गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जेवण केल्यानंतर घराच्या समोर दोन मुलांसोबत शतपावली करीत होते. घराच्या आजुबाजूला सर्वत्र अंधार होता. दरम्यान तेथे आलेल्या वाघाने वडिलांसमोरच शुभमला तोंडात पकडून उचलून नेले. वडील बबन मानकर यांनी आरडाओरड केल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.

या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता मानकर यांच्या घरासमोर ग्रामस्थांची गर्दी जमली. माहिती मिळताच सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकाळ ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी ग्रामस्थांनी वनाधिकारी व कर्मचारी यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला.

वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती सायंकाळ यांनी घटनेची पूर्ण माहिती घेऊन मुलाचा शोध सुरू केला. मुलगा अद्यापही बेपत्ता असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती असून पोलिसांना पाचारण करण्यात आले.