अमरावती : विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वर्षासहलीसाठी पर्यटकांची पावले चिखलदराकडे वळू लागली आहे. धुक्यात हरवलेले रस्ते, रिमझिम बरसणाऱ्या सरी, उंचीवरून दरीत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी या नगरीत पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

पावसाच्या धारांनी बहरलेल्या निसर्गाचे अनोखे रुप पर्यटकांना अनुभवायाला मिळते. यावर्षी पावसाचे पुनरागमन उशिरा झाले असला तरी चिखलदऱ्याने मात्र आपले सौंदर्य फुलवायला अजिबात वेळ लावला नाही. थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्याची राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने एक वेगळी ओळख आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असलेली पावसाची अपेक्षा अखेर संपली. जोरदार पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे हिरवे सौंदर्य पुन्हा फूलले.

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश

चिखलदरा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. प्रामुख्याने शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने पर्यटकांनी चिखलदरा पर्यटन स्थळी जाण्या-येण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम व मोटार वाहन कायदा अन्वये येत्या २८ सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीतील दर आठवड्याच्या शनिवार व रविवार या दिवशी चिखलदरा येथे येण्यासाठी परतवाडा ते चिखलदरा या मार्गावरील वाहतुक ही परतवाडा वरून धामणगाव गढी मार्गे चिखलदरा या मार्गाने तर चिखलदरा येथून जाण्यासाठी चिखलदरा ते परतवाडा या मार्गावरील वाहतुक घटांग, परतवाडा या प्रकारे एक मार्गी (वन-वे) वळविण्याचे आदेश येरेकर यांनी निर्गमित केलेले आहेत.

चिखलदरा पर्यटन स्थळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्यातील तीन महिन्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक चारचाकी, दुचाकी, ऑटो, ट्रॅव्हर्ल्स, बस अशा वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. प्रामुख्याने पर्यटक हे चिखलदरा ते परतवाडा या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता अरूंद असून नागमोडी वळणाचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिखलदरा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असून जंगलातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात संचार करीत असल्याने रस्त्यावर येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांसोबतही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक एक मार्गी (वन-वे) वळविण्यात आली आहे. चिखलदरा पर्यटनस्थळी जाताना पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.