लोकसत्ता टीम
अमरावती : लोकसभेची निवडणूक अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली असताना वातावरण तापू लागले आहे. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक उमेदवारांनी प्रचाराची संधी साधली. त्याचवेळी येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा पोहचल्या असता काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘वारे पंजा, आया पंजा’ अशा घोषणा दिल्या. ही चित्रफित चांगलीच प्रसारीत झाली आहे.
नवनीत राणा या आपल्या समर्थकांसोबत शनिवारी मध्यरात्री इर्विन चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचल्या होत्या. त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्या चबुतऱ्यावरून खाली उतरत असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे ‘वारे पंजा, आया पंजा’ अशा घोषणा दिल्या. त्यावेळी नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांच्या दिशेने पाहिले, पण कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळून त्या तेथून निघून गेल्या.
आणखी वाचा-नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
या घोषणाबाजीची चित्रफित प्रसारीत झाली असून समाज माध्यमांवर सध्या चांगलीच गाजू लागली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे लढत देत आहेत. चुरशीच्या या लढाईत कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या, यावेळी त्या विरोधात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात बोलण्याची संधी मिळाली आहे.