Nagpur Police Cyber Club: सध्या शहरात सायबर गुन्हेगारांनी हैदोस घातला असून रोज लाखो रुपयांनी नागपूरकरांची लुबाडणूक सुरु आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून फसवणूक करीत आहे. त्यांच्या जाळ्यात सहजरित्या अनेक जण अडकत आहेत. सायबर गुन्हे रोखायचे असतील तर जनजागृती होणे गरजेचे आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक व युवतींमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आवश्यक आहे. विद्यार्थीच सायबर गुन्हेगारी रोकू शकतात. ही बाब हेरून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या सकारात्मक भूमिका घेऊन एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘सायबर क्लब’ बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी या मोहिमेची सुरुवात रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सिंगल म्हणाले की, तरुण पीढी ही देशाचे भविष्य आहे. त्यांच्यात सायबर गुन्ह्यांबाबत जागृती झाली तर भविष्यात सायबर गुन्ह्यांवर आळा घालता येईल. सामान्यत: लोकांना हेच माहिती नसते की, सायबर गुन्ह्याविरुद्ध तक्रार कशी करायची. त्यामुळे ही मोहीम राबवून तरुणांना याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील सर्व महाविद्यालय आणि शाळांमध्ये सायबर क्लबची स्थापना केली जाईल. या क्लबमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची समिती तयार केली जाईल. सर्व क्लबमध्ये तरुणींचा सहभाग अनिवार्य असेल. महिला आणि तरुणी त्यांच्या समोर आपल्या अडचणी ठेवू शकतील. सायबर क्लबचा एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला जाईल आणि त्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. महाविद्यालयातील कोणताही सायबर गुन्ह्याला बळी पडला तर क्लबच्या सदस्यांशी संपर्क करेल. क्लबचे सदस्य पीडिताची पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घालून देतील. हेही वाचा : चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वरोऱ्यावर शिंदे सेनेचा दावा प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाण्यांत सायबरशी संबंधित तक्रारीचे समाधान करण्यासाठी सायबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. ते त्यांच्या भागातील महाविद्यालयांतील सायबर क्लबची देखरेख करतील. तक्रार मिळताच राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर त्याची नोंद करून ऑनलाईन प्रत दिली जाईल. तक्रारीचे स्वरुप पाहून ती सायबर पोलीस ठण्यात पाठविण्यात येईल. सायबर क्लबचा मुख्य उद्देश पीडित व्यक्तीला ३० मिनिटांच्या आत मदत पोहोचविणे आहे. सर्व सदस्यांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती दिली जाईल. ते इतरांनाही त्याबाबत मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका रश्मी वेलेकर यांनी मांडली. हेही वाचा : यवतमाळच्या गुन्हेगारीचा दिल्लीत डंका! सायबरचे प्रशिक्षण देणार सायबर गुन्हेगार दररोज नव-नवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे सायबर क्लबच्या सदस्यांना त्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदस्यांना वेळो-वेळी त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांचे काम असले तरी गुन्हा घडूच नये, हे जनजागृतीतूनच शक्य आहे. संचालन वेदांत व वराध्या या विद्यार्थ्यांनी तर आभार प्राध्यापक राकेश कडू यांनी मानले.