गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याकरिता आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा प्रभारी बेल्लई नाईक हे गडचिरोली येथे आले होते. यावेळी तब्बल २४ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. यात आरमोरी आणि गडचिरोलीकरिता सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे अंतिम उमेदवारी जाहीर करताना काँग्रेस पक्षाची चांगलीच दमछाक होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

काँग्रेसला लोकसभेत मिळालेल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीकरिता अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. त्या अनुषंगाने सर्वच इच्छुक उमेदवारांनी गेल्या महिनाभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात आरमोरी आणि गडचिरोली विधानसभेत सर्वाधिक चुरस बघायला मिळत आहे. तर अहेरीमध्ये केवळ दोन प्रबळ दावेदार असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप ठरलेले नसले तरी काँग्रेसमध्ये सध्या उमेदवारीसाठी मोठी चढाओढ दिसून येत आहे.

हेही वाचा : अकोला: उमेदवारीसाठी काँग्रेसमध्येच संघर्ष…इच्छुकांमधील तब्बल १५ जणांचा गट…

यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस प्रभारी बेल्लई नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये गडचिरोली विधानसभेकरिता विश्वजीत कोवासे, मनोहर पोरेटी यांच्यासह सहा इच्छुकांनी दावा केला आहे. आरमोरीसाठी माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम, डॉ. आशीष कोरेटी या प्रमुख इच्छुकांसह १३ जणांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यामुळे चर्चेत आलेल्या अहेरी विधानसभेसाठी हनुमंतू मडावी आणि माजी आमदार पेंटारामा तलांडी यांनी मुलाखत दिली.

तीनही विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असे दोन गट थेट प्रतिस्पर्धी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्यांमुळे जुन्यांची अडचण

एरवी जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही न दिसणारे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीकरिता धडपड करीत असल्याने पक्षातील जुन्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. यातील काही तर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मैदानात उतरले आहेत. यामध्ये डॉ. सोनल कोवे, माधुरी मडावी, डॉ. मेघा सावसागडे, डॉ. शिलू चिमूरकर, उषा धुर्वे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्याला संधी मिळणार की वेळेवर दावा करणाऱ्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.