गोंदिया : धावत्या रेल्वेगाडीत सिगारेटचा झुरका घेणे प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे विभागाने विशेष सुरक्षा मोहिमेअंतर्गत रेल्वेगाडीत धुम्रपान करणाऱ्या ९२ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. धावत्या रेल्वेगाडीत धुम्रपान किंवा स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थांसह प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे रेल्वे मालमत्तेचेच नव्हे तर सहप्रवाशांचेही नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
हेही वाचा : दिवाळीत रेल्वेने प्रवास करताना ‘या’ वस्तू घेऊन जाऊ नका; रेल्वेने दिला इशारा
अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाकडून कारवाई केली जात आहे. तपासणी मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात धुम्रपानाच्या ९२ प्रकरणांची नोंद करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने यात १८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. धावत्या रेल्वेगाडीत धुम्रपान करू नये, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती केली जाते. मात्र, या कारवाईमुळे जनजागृतीचा काहीही परिणाम होत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.