नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीचा उत्सव साजरा करण्यासाठी लाखोच्या संख्येत भीम अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आले. ‘जयभीम’च्या जयघोषासह दीक्षाभूमीकडे जाणारे रस्ते अनुयायांनी गजबजले. स्थानिक प्रशासनानेही अनुयायांच्या सोयीसाठी तयारी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले.
डॉ.आंबेडकर यांनी १९५६ साली दीक्षाभूमीवर पाच लाख अनुयायांच्या उपस्थित बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येत अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यंदा अनुयायांची संख्येत भर प़डणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून दीक्षाभूमीवर दक्षिण भारतातील राज्य कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तमिळना़डू राज्यातूनही मोठ्या संख्येत अनुयायी येत आहेत. याशिवाय उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमधील अनुयायांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रयत्न केले. पावसामुळे दीक्षाभूमी परिसराची झालेली दुरवस्था सुधारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला, मात्र हे प्रयत्न पुरेसे ठरणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बौद्धगया मुक्तीचा संदेश गाजणार
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भदंत आर्य नार्गाजुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खु संघाद्वारे सकाळी ९ वाजता सामूहिक बुद्ध वंदना घेतली जाईल. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे वाचन देखील होईल. यानंतर सायंकाळी सहा वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा पार पडेल. यात मुख्य अतिथी म्हणून उत्तरप्रदेश येथील भंते विनाचार्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बिहारमधील महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनात विनाचार्य यांचे महत्वपूर्ण योगदान असून दीक्षाभूमीच्या मंचावरून बौद्ध धर्मीयांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या बौद्धगया मुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. भंते विनाचार्य यांच्यासह अतिथी म्हणून उत्तरप्रदेशातील भदंत चंदिमा थेरो, आयएएस अधिकारी डॉ.राजशेखर वृंद प्रामुख्याने उपस्थित राहतील.
२५ ठिकाणी निवासव्यवस्था
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमी दीक्षाभूमी परिसरात असणाऱ्या शाळा, महाविद्यालय तसेच वसतिगृह, सभागृह, शासकीय कार्यालये अशा २५ ठिकाणी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. अनुयायांना याबाबत माहिती देण्यासाठी जागोजागी फलक तसेच क्युआर कोड लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी बुधवारी दीक्षाभूमीवरील व्यवस्थेच्या संदर्भात पाहणी केली आणि आवश्यक दिशानिर्देश दिले.