नागपूर: स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात राज्यातील विविध भागात आंदोलन पेटले असतांनाच या मीटरला स्मार्ट टाईम ऑफ डे मीटर (टी. ओ. डी.) असे नाव देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातच मीटर लावण्याला गती दिली गेली आहे. नागपूर जिल्ह्यात २.७८ लाखाहून अधिक जुने मीटर काढून हे मीटर लावले गेले आहे. या मीटरमुळे ग्राहकांना कोणता लाभ मिळणार? याबाबत महावितरणने महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील औद्योगिक ग्राहकांना मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत १ जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात लक्षणीय बचत करण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याचा महावितरणचा दावा आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार, हे मीटर असलेल्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच्या वेळेत वापरलेल्या विजेवर विशेष सवलत मिळणार असून ती टप्या- टप्याने वाढत जाईल. सध्या प्रति युनिट ८० पैसे सवलत असून २०२९- ३० पर्यंत ही सवलत प्रति युनिट १ रुपयापर्यंत असेल. ग्राहकांनी त्यांच्याकडील वॉशिंग मशीन, गीझर, एअर कंडिशनर (एसी) यांसारखी जास्त वीज वापरणारी उपकरणं सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरल्यास त्यांच्या देयकात मोठी बचत होणार आहे.
टीओडी मीटरला लाभ काय ?
महावितरच्या दाव्यानुसार टीओडी मीटर वीज वापराची नोंद अचूकपणे करत असल्याने देयकातील चुका टाळता येतात. मोबाईल ॲपवर ग्राहक त्यांचा वीज वापर कधी आणि किती होतो हे पाहू शकतो. कोणत्या वेळेत वीज स्वस्त आहे हे माहीत असल्यामुळे ग्राहक अधिक जागरूकपणे वीज वापर करतो. महावितरण हे मीटर मोफत बसवून देतो. हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड असल्यामुळे रिचार्ज करण्याची किंवा अचानक वीज खंडित होण्याची चिंता नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नका…
स्मार्ट मीटरमुळे देयक जास्त येत नाही. उलट, ग्राहक वीज वापर योग्यप्रकारे नियोजित करून बचत करू शकता. हे मीटर बसवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, यातून निघणारे रेडिएशन मोबाईल फोनपेक्षा खूप कमी असल्याने हे मीटर आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचा महावितरणचा दावा आहे. महावितरणच्या सर्व ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावेत आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. हे मीटर ऊर्जा व्यवस्थापनात क्रांती घडवतील सोबतच वीज चोरीला आळा घालून वितरण गळती कमी करण्यास मदत करतील, असेही महावितरणचे म्हणने आहे.