नागपूर : भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वितृष्ट अतिशय टोकाचे असले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका उड्डाणपुलाला काँग्रेसच्या नेत्याचे नाव दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधण्याचा धडाका लावला आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे उभारण्यात येत आहेत. नागपुरातही मोठ्या संख्येने उड्डाणपूल, भुयारी मार्गाचे काम सुरू आहेत.

नागपुरातील अमरावती मार्गावरील आरटीओ चौक ते फुटाळा चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. फुटाळा चौकाच्या दिशेने सर्व्हिस रोडचे काम केल्या जात आहे. या प्रकल्पासाठी विविध परवानगी मिळण्यात विलंब झाल्याने उड्डाणपुलाच्या पूर्णत्वासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागली.

‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’

बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत २.८५ किमी लांबीचा आहे. शहरातील सर्वांत वर्दळीचा हा उड्डाणपूल असून, उड्डाणपुलाला ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे, तर वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उड्डाणपूल १.९५ किमी लांबीचा आहे. पुलावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितास निश्चित केली आहे.

मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर

पुलावर एकूण ७६६ सेग्मेंट्स बसविण्यात आले असून, लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून ६५ मीटर लांबीचे, २५० टन वजनाचे ६ गर्डर्स उभारण्यात आले आहेत. महाराजबाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू केली जाणार आहे.

बांधकाम सार्वजनिक विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत ४७८ कोटी रुपये खर्चुन अमरावती रस्ते वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल बाधण्यात आला आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अमरावती रोडवरून ५ किमी अंतर फक्त ५ मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होणार आहे

अमरावती महामार्गावरील ब्लँक स्पॉट संपविणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मे २०२१ मध्ये दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारा (१.९५ किमी) उड्डाणपूल सुरू झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते नागपूर विद्यापीठ कॅम्पपर्यंतच्या (२.८५ किमी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. १५ ऑगस्टपूर्वी हा उड्डाणपूल सुरू होणार होते.

गडकरी यांच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून तर वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या ५ कि.मी. अंतरावर दोन उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ झाला. अमरावती महामार्गावरील वाडी नाका ते वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या सुमारे अडीच किमीचा उड्डाणपूल सुरू झाला. अमरावती महामार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पात, फुटाळा तलाव चौक, विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ पर्यंतच्या पुलाचे काम रेंगाळले आहे. आरटीओ कार्यालयासमोरील जुन्या नाल्यावर पूल बांधण्याचे काम केले जात आहे. याशिवाय आरटीओ ते बोले पेट्रोल पंपपर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पहिल्या टप्प्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय ते विद्यापीठ कॅम्पसपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र अनेक अडचणीमुळे हा मार्ग तयार करण्यासाठी विलंब झाला आहे. सध्या नाल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जुलै २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. एकूण ४७८ कोटींच्या दोन उड्डाणपुलाला अतिरिक्त कालावधी लागल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशिरा मिळाल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाला उशीर झाला होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हा उड्डाण पूल बोले पेट्रोल पम्पपासून सुरू होते आणि नागपूर विद्यापीठाच्या चौकात उतरते. पुलाखालील रस्ता सिमेंट कॉक्रीटचा करण्यातयेत आहे. काही ठिकाणीते काम पूर्ण झाले तर अजून काही काम शिल्लक आहे. उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आरटीओ चौक आणि आसपासच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.