Devendra Fadnavis on Successor of PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ७५ वर्षांचे आहेत. तर २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते. त्यामुळे आता हा नियम त्यांनाही लागू होऊन २०२९ साठी भाजप पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असे सूचक वक्तव्य केले. यावर आता खुद्द फडणवीस यांनी उत्तर देत, पंतप्रधान मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले. नागपूर मध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उत्तराधिकारी शोधणे ही मुघली संस्कृती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनिया गांधींनी आतातरी भारतीय शिक्षण स्वीकारावे

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून नवीन शिक्षण पद्धतीवर ताशेरे उडले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी सोनिया गांधींच्या सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या भारत शिक्षण पद्धतीचे भारतीयकरण होणे यात कुठलाही गैरप्रकार नाही. लॉर्ड मेकाले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षण पद्धती आणली होती। त्यामुळे ती आम्हाला कदापी मान्य नाही असे फडणवीस म्हणाले.