नागपूर : मुंबईत १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड असलेला सलीम कुत्ता याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगतोय. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेता सुधाकर बडगुजर फार्म हाउसवर सलीम कुत्ताच्या नावाने पार्टी करतोय, या देशद्रोह्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली.

“उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता… सलीम कुत्ता…” अशी नारेबाजी करत आमदारांनी परिसर दणाणून सोडला. सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण हे नाशिकचा प्रत्येक माणूस जाणतो, असा थेट आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी केला. या देशद्रोह्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. बडगुजर हा सलीम कुत्ताला फायनान्स करतो. हे देशद्रोह्यांचे उदात्तीकरण आहे, असेदेखील भुसे म्हणाले.

हेही वाचा : एनआयएची अचलपुरात छापेमारी, युवकाची चौकशी; कारवाईबाबत कमालीची गुप्तता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९८ मध्ये हत्या झाली तर जेलमध्ये शिक्षा कोण भोगतोय?

आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याची हत्या १९९८ मध्ये झाल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना भुसे म्हणाले,‘सलीम कुत्ता मेला असेल तर त्याच्या नावाने नाशिक जेलमध्ये शिक्षा कोण भोगतोय, याचीदेखील चौकशी झालीच पाहिजे.’ या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. यावेळी आंदोलनात भरत गोगावले, संतोष बांगर, दिलीप लांडे, श्रीनिवास वंगा, मंजुळा गावित, यामिनी जाधव, गीता जैन आदींची उपस्थिती होती.