नागपूर : भारतीय जनता पक्षाची ओबीसी जागर यात्रा सध्या सुरू आहे. रविवारी ती काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात होती. हा मतदारसंघ केदार यांचा बालेकिल्ला मानला जातो. नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी आमदार डॉ. आशीष देशमुख हे यात्रेचे नेतृत्व करीत आहे. आव्हाण दहेगाव (रंगारी) येथे ओबीसी जागर यात्रेच्या निमित्ताने मेळावा झाला. केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसीच्या कल्याणकारी योजना सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी समाजापर्यंत पोहचू दिल्या नाहीत. त्यांची भूमिका ओबीसी विरोधी आहे,अशी टीका आशीष देशमुख यांनी केली.
हेही वाचा : ‘हे’ भाजपला महागात पडेल, रविकांत तुपकर म्हणाले ‘सर्वाधिक आमदार विदर्भात असूनही…’
ते म्हणाले, “मागील पाच ते सहा टर्म पासून सुनील केदार सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत, मात्र याठिकाणी रोजगाराची साधने नाहीत. एकही कारखाना नाही. शेतकऱ्यांचे हाल आहेत. येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य जनता त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.” ओबीसी जागर यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.