नागपूर : आज मुली प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या बळावर स्वत:चे नाव कमावत आहे. मुलींच्या या प्रगतीसोबतच असुरक्षितता यासारखे आव्हानही समाजापुढे निर्माण झाले. बाहेर काम करणाऱ्या मुलीची चिंता पालकांना असणे हे साहजिकच आहे आणि अलिकडे वाढत असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांमुळे ही चिंता अधिक बळकट झाली आहे. मात्र आता नागपूरच्या एका प्राध्यापकाने असे संशोधन केले आहे, ज्यामुळे पालकांची चिंता मिटणार आहे. मुलगी कुठे आहे? सुरक्षित आहे का? तिच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे काय? याबाबत थेट पालकांना माहिती मिळेल अशाप्रकारचे नवे संशोधन करण्यात आले आहे.

काय आहे नवे संशोधन?

मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयोग नागपूरच्या प्राध्यापकाने केला आहे. त्यांनी मुलींच्या जुती किंवा सैंडल्सच्या सोलमध्ये जीपीएस व जीएसएम तंत्र बसविले आहे. कोणत्याही आपत्तीच्या वेळी सोलमधल्या ‘प्रेशर सेन्सर’द्वारे पोलिस, अॅम्ब्युलन्स व घरच्यांनाही ताबडतोब मदतीसाठी संदेश जाईल. एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे तंत्र विकसित केले आहे. त्यांनी जुतीच्या सोलमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम व जीएएसएम सिस्टीम फिट केले आहे. शिवाय अंगठ्चाच्या खाली प्रेशर सेन्सर लावला आहे. रात्री-बेरात्री बाहेर असताना किंवा दिवसाही कधी महिला, मुलींसोबत अनुचित घटना घडत असेल, तर प्रेशर पॉइंटद्वारे जुळलेल्या क्रमांकावर जीएसएम सिस्टीमने ताबडतोब संदेश जाईल. हा संदेश घरच्यांसोबत पोलिसांना आणि रुग्णवाहिकेलासुद्धा पोहचेल. जीपीएस सिस्टीमने मुलीचे लोकेशन पटकन कळेल आणि मदत पोहचविण्यास मदत होईल, असा दावा प्रा. पेठे यांनी केला आहे.डॉ. पेठे यांच्या संकल्पनेतून हे तंत्र विकसित करण्यात व्यंकट रेड्डी, आर्यन सिंह, ईशा मानवटकर व विशाल टिकले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पेटंट मंजूर झाल्यावर कंपन्यांशी करार करून व्यावसायिक उपयोगासाठी तयार करण्यात येईल, असे डॉ. पेठे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘समृद्धी’वर अपघात थांब‌विण्यासाठीही उपाय

समृद्धी महामार्गावर नेहमी अपधात होत असतात. हा सिमेंटचा रस्ता सरळ व पूर्णपणे पांढरा आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. वाहनचालकांनी ठराविक अंतरावर थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘फास्टॅग’मध्येच अंतर मोजण्याचे तंत्र फिट करण्यात येईल.हे तंत्र दर ५० किमीवर अलर्ट देईल. १५० किमी चालल्यावर वाहन थांबविणे आवश्यक असेल. चालक थांबला नाही तर त्यांच्या फास्टॅगमधूनच दंड वसूल करण्यात येईल.