नागपूर : बांधकामातील त्रुटींमुळे वादग्रस्त ठरलेल्या महामेट्रोने विविध प्रकारच्या जाहिरातींवर ३ कोटी २ लाख ४६ हजार २४८ रुपये खर्च केले आहेत. अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या तपशिलात ही बाब नमूद आहे.
महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या मेट्रोच्या कामांवर ‘कॅग’ने यापूर्वीच ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर महामेट्रोने जाहिरातींवर केलेला खर्च धक्कादायक स्वरुपाचा आहे. आरटीआय तपशीलानुसार महामेट्रोने जाहिरातीवर तब्बल ३ कोटी २ लाख ४६ हजार २४८ रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, मेट्रोला त्यांच्या विविध स्थानकांवर व तत्सम उपक्रमातून जाहिरातीद्वारे मिळालेल्या उत्पन्नापेक्षा वरील खर्च अधिक आहे. महामेट्रोला जाहिरातीतून एकूण २८ लाख ७९ हजार ५८५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
हेही वाचा – गोंदिया: मानसिक ताण-तणावातून युवकाने स्वत:वरच केला चाकुने वार
हेही वाचा – ..तर व्यवसायावर गंडांतर! ‘महारेरा’ कायद्याअंतर्गत मालमत्ता दलालांना नोंदणी बंधनकारक
मागील तीन वर्षांत महामट्रोला प्रवासी सेवेच्या तुलनेत अन्य स्त्रोतांकडून अधिक उत्पन्न मिळाले आहे. २०२०-२१ पासून तीन वर्षांत प्रवासी सेवेतून एकूण २९.०२ कोटी तर अन्य स्रोतांपासून १०७ .११ कोटींचा महसूल मिळाला. चालू वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत मेट्रोतून ७८ लाख ८० हजार प्रवाशांनी प्रवास केला व त्यातून १३ कोटी २७ लाख ४५ हजार ८९ हजार रुपये महसूल प्राप्त झाला.