नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे दिवंगत नेते सोनबाजी मुसळे यांच्या मुलाला रेल्वे उड्डाणपूल आणि कळमेश्वर येथील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट मिळाल्याची माहिती दिली. या कामांची गुणवत्ता उत्तम राखण्याच्या स्पष्ट सूचना गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरातील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाण पुलाच्या तसेच कळमेश्वर मधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पाचे भूमिपूजन आज गडकरींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सोनबाजी मुसळे यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी काँग्रेसचे सुनील केदार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, ते शासकीय कंत्राटदार असल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरला आणि त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने वडिलांचा कंत्राटी व्यवसाय पुढे चालवला. आता त्याला रेल्वे उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे कंत्राट मिळाले आहे. या निमित्ताने गडकरी यांनी मुसळे कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले आणि विकासकामांत पारदर्शकता व दर्जा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
कळमेश्वर नागपूरचे सॅटॅलाइट सिटी
कळमेश्वर हे शहर एक सॅटॅलाइट सिटी म्हणून विकसित होईल. त्याचप्रमाणे येथील हातमागाच्या व्यवसायाच्या माध्यमातून हे शहर जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. कळमेश्वर शहरातील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाण पुलाच्या तसेच कळमेश्वर मधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पाचे भूमिपूजन आज गडकरींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
५५ कोटी रुपयांच्या तरतुदीने सेतुबंधन योजनेअंतर्गत येणाऱ्या सुमारे ५३६ मीटर लांबीच्या रेल्वे उड्डाण पुलामुळे या रेल्वे क्रॉसिंग वरील रेल्वेच्या वाहतुकीमुळे वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे फाटक पासून कळमेश्वरवासीयांना दिलासा मिळणार असून पर्यायाने त्यांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. ‘वन टाइम इम्प्रूव्हमेंट ‘अंतर्गत सुमारे ९६ कोटी रुपयांच्या तरतुदी अंतर्गत ९.५ किमी रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा, रस्त्यांचे व्हाईट टॉपिंगसह मजबुतीकरण, ड्रेनेज वाहिनींची सुधारणा, पुलांची पुनर्बांधणी, पादचारी मार्ग तसेच बस थांबे, पथदिवे आणि जलनिस्सारण सुविधा या प्रकल्पात समाविष्ट आहे.
धापेवाडा टेक्सटाईल
धापेवाडा टेक्सटाईलचा विकास स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक कापड उद्योग आणि हस्तकला यामुळे गावाची ओळख फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
