नागपूर : सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरीही प्रशिक्षित मनुष्यबळ ही काळाची गरज असणार आहे. हे मनुष्यबळ शैक्षणिक धोरणांमधील बदलांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख तांत्रिक शिक्षण, रोजगाराभिमूख कौशल्य विकास यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मंथनच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षक परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, कौशल्य असेल तर तुम्हाला मागाल तेवढे वेतन दिले जाते. आज उच्च महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दोन लाख रुपये वेतन आहे. मात्र, माझे भाषण ऐकल्यावर लगेच आठव्या वेतन आयोगाची मागणी करू नका. गडकरींनी अशी मिश्किल टीपणी करताना सभागृहात हास्यकल्लोळ बघायला मिळाला.
या कार्यक्रमाला भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सुभाष कोंडावार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवरणकर, डॉ. श्रीपाद ढेकणे, माजी आमदार नागो गाणार, मोहित शाह, विष्णू चांगदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘२०२० मध्ये आपण शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्या धोरणाचे उद्दिष्ट्य समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशात अनेक क्षेत्रात अनेक लोक उत्तम काम करतात. परंतु, भविष्यातील माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज आहे. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे, जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायचे आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. विश्वगुरू म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर फक्त आर्थिक आधारावर ते शक्य नाही. त्यासाठी आपली संस्कृती, परंपरा, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती याचा देखील विचार करावा लागेल. त्याचेही वेगळेपण समजून घ्यावे लागेल. भविष्यातील पिढी तयार करण्यासाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
शिक्षण म्हणजे गुणांची शर्यत समजली जाते. पण शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि संस्कार होय. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जो भविष्यातील माणूस उभा करायचा आहे, त्यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन यावर जोर द्यावा लागेल. आपल्याच देशात सगळं ज्ञान आहे, असे नाही. जगात अनेक देशांमधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.
एखादे कौशल्य विकसित केले तर त्यातून रोजगार निर्माण करता येतो. त्यामुळे जगाची आणि आपली काय गरज आहे, आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाला कोणते प्रशिक्षण-शिक्षण दिले पाहिजे, याचा विचार करावा लागेल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजीटल शिक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करावा लागेल, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.