नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता उघड्यावर आला आहे. परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी आज विधान भवनासमोर आंदोलन करत फुके आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. त्यामुळे प्रिया फुके नेकम्या कोण आहेत? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रिया फुके या परियण फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नी आहेत. प्रिया फुके यांच्याकडून यापूर्वीही परिणय फुके यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. त्यांचे आरोप आहेत की, भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंड्याप्रमाणे मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीही मला बघतो बघतो सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप केला आहे.

फसवणूक करून लग्नाचा आरोप

संकेत फुके यांच्यासोबत माझे २०१२ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला होता. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. माझी फसवणूक करुन हे लग्न झाले होते. माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होतो. २०२२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा ‘तू कोण आहेत?’, ‘तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे?’ असे विचारत मला रात्री १० वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे, असे प्रिया फुके यांनी सांगितले. माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात, त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात. आताही पत्रकार परिषदेला येतान माझ्या मागे दोन माणसं होती, ती कोण होती, हे मला माहिती नाही. माझ्यावर ॲट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजी-आजोबांनी कोर्टात केस करुन माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी हक्क मागतेय माझा, मी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करुन आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असा आरोप प्रिया फुके यांनी केला.