नागपूर : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या प्रकरणाने राजकीय पुढाऱ्यांची हुंड्याविषयी मानसिकता समोर आली. नागपुरातील एका राजकीय कुटुंबातील एका सुनेने छळाची तक्रार दिल्यानंतर भाजपच्या आमदाराच्या कुटुंबाविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हवगणे यांनी १६ मे रोजी आत्महत्या केली आहे. हगवणे कुटुंबातील दुसरी सून मयुरीचा देखील छळ झाला होता. महिला आयोगाने मात्र दखल घेतली नाही.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुनेची आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना नागपुरात भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांचा दिवंगत भाऊ संकेत यांची पत्नी प्रिया फुके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संकेत फुके किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ही बाब लग्नाच्या वेळी लपवून ठेवण्यात आली. आमचे कुटुंब सधन असून राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तु शांत राहिली नाहीस तर तुझा आई आणि बहिणीवर अत्याचार करवू, अशी धमकी सासऱ्यांनी दिली. संकेत यांचा मृत्यू सप्टेंबर २०२२ ला झाला होता. त्यानंतर एटीएम कार्ड, बँक पास बुक, दागिणे बळजबरीने काढून घेतले. अताशा आशीर्वाद बिल्डर्समधील ४० टक्के शेअरर्स परस्पर सासू-सासऱ्याच्या नावाने करवून घेतले, अशी तक्रार प्रिया फुके यांची आहे.
याप्रकरणात आमदार फुके यांच्यासह रमेश गोविंदराव फुके (७२), आई रमा फुके (६७), पत्नी परिणिता फुके (४१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आज प्रिया फुके यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे धावून आल्या. पोलीस फुके कुटुंबीयांना आश्रय देत आहे. तर प्रिया फुके यांना वारंवार चौकशीला बोलावून पीडित महिलांचा छळ करीत आहे. तर महिला आयोगाला सात पत्र लिहले तरी आयागोने दखल घेतली नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिले तरी फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही, असे सुषमा अंधारे यांनी आरोप केला.