नागपूर: शहरात डेंग्यू उच्चांक गाठत असून रुग्ण संख्या वाढतच आहे. नागपूर महापालिकेच्या प्रयोगशाळेत डेंग्यूचे निदान करणाऱ्या किटचा तुटवडा होता. आता १० किट्स पोहचल्या पण १,१५६ नमुने प्रलंबित असल्याने त्याचीच तपासणी पहिली होईल. मग नवीन संशयितांची चाचणी होणार कधी? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
महापालिकेला मिळालेल्या एका डेंग्यू तपासणी किटवर केवळ ९८ संशयितांचे नमुने तपासता येतात. नागपूर महापालिकेकडे जवळपास १,१५६ नमुने प्रलंबित आहे. तेव्हा हे सर्व प्रलंबित नमुनेही या किट्सवर तपासणे शक्य नसल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात. नागपुरात पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे या पद्धतीचे हवामानातील आर्द्रता डासांसाठी पोषक वातावरण ठरत आहे. त्यात जागोजागी साचलेले पाणी, घरेच्याघरे बनलेले डासांच्या उत्पत्तीचे केंद्र यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
हेही वाचा… धक्कादायक..! अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाचा खून
डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे प्रभावी यंत्रणा नाही. यातच कमी मनुष्यबळ व यंत्रामुळे धूर फवारणी व कीटकनाशक फवारणीला मर्यादा आल्या आहेत. घर तपासणी मोहिमेत त्याच त्याच घरात डेंग्यू अळी आढळून येत असतानाही दंडात्मक कारवाई होत नसल्याने डेंग्यू कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. सध्या शहरातील संशयित रुग्णांची संख्या चार हजारावर तर त्यापैकी डेंग्यूचे निदान झालेल्यांची संख्या चारशेहून अधिक आहे, हे विशेष.