नागपूर : वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंगची कटकट आणि पार्किंगची डोकेदुखी टाळण्यासाठी नागपूरकर ओला- उबेर कार बुकिंगला फ्रेंडली झाले आहेत. ज्यांना दूरवरचे अंतर गाठायचे आहे, ते झूम कार बूक करीत सोयीचा मार्ग निवडतात. आजवर हे एकीवात होते. मात्र एखादा काय शक्कल लढवेल अन् काय प्रताप करेल याचा आता नेम राहिलेला नाही. असाच काहीसा प्रकार पाहून जलालखेडा ग्रामीण पोलिसांचे पथकही चक्रावले.
विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांचे हे पथक घरफोडीच्या एका गुन्ह्याचा छडा लावत होते. त्यावेळी चव्हाट्यावर आलेला हा प्रकार पाहून पोलिसांनाच धक्का बसला. बकऱ्यांची चोरी करण्यासाठी एका टोळीन चक्क झूम कारची बुकिंग करीत ग्रामीण भागातून २२ बकऱ्या चोरल्याचे पाहून पोलिसांनाही चोरट्यांनी लढविलेली ही नवी शक्कल पाहून चक्कर येण्याची वेळ आली.
विशेष म्हणजे या टोळीने चोरी करण्यासाठी एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकालाही हाताशी धरले होते. जावेद खान अश्फाक खान (वय ३२, वाईंट चर्च, पलोटी नगर गोरेवाडा), अभिषेक योगेश तागडे (वय २२, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स), उस्मान खान अकबर खान उर्फ इरफान (वय २१, बरकते रजा मस्जिद, कामगार नगर), अक्षय मनोज पंचलवार ( वय २६, इंगोले लेआऊट गोधनी), बाबू उर्फ मायकल गुड्डू (वय १८, रा. ढोरे लेआऊ, मानकापूर), तुषार अनिल शर्मा,( रा. मानकापूर), भुऱ्या उर्फ प्रकाश माहुरे ( ४०, रा. चंद्रकला नगर, तांडापेठ) अशी या अफलातून शक्कल लढविणाऱ्या बकऱ्या चोरांच्या टोळीतल्या सदस्यांची नावे आहेत. चोरट्यांनी यातील काही बकऱ्या भुऱ्या उर्फ प्रकाश माहुरे याला विकल्या आहेत.
जलालखेडा पोलिसांनी या आठही जणांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली असून त्यांनी चोरीत वापरलेली महिंद्रा बोलेरो (एम. एच. २१, सी. २१३२) , मारुती सुझुकी एक्सप्रेसो (एम. एच. ४९, बी. डब्ल्यू ७२६४) ह ६ भ्रमणदूरध्वनी, रोख ८० हजार असा ९ लाख ३३ हजारांचा माल हस्तगत केला.
आतापर्यंत चोरल्या २२ बकऱ्या
या बकरी चोरांनी आधी १४ जूनला एम. एच. २१ सी. २१३२ या बोलेरो कारमधून भिष्णूर परिसरातल्या नदी काठच्या एका गोठ्यातून १० बकऱ्या चोरल्या. जावेदने त्याच रात्री स्वतःच्या भ्रमण दूरध्वनीवरून सुझूकी अर्टिगा झूम कार बुकिंग करीत भिष्णूर परिसरातल्या अवलिया बाबा दर्गाह जवळून ९ बकऱ्या चोरल्या. पुन्हा जावेदने २० जूनला महिंद्रा टियुव्ही झूम कार बूक करीत सावरगाव परिसरातील एका शेतातून ३ बकऱ्या चोरल्या.