नागपूर : राज्यात शिवसेना पक्षाच्या एका गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाचे अजीत पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मंत्री सुर्यप्रताप साही यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस पून्हा मुख्यमंत्री बनतील असे नागपुरात वक्तव्य केले. त्यामुळे पून्हा राजकीय चर्चा रंगल्या आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शिवसेना पक्षात फुट पडली. त्यानंतर शिवसेनाच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात नवीन सरकार बनवले. याप्रसंगी भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडून अजीत पवार गट सरकारमध्ये सहभागी झाले.

हेही वाचा : बुलढाणा : पिकांची अतोनात नासाडी, सव्वादोनशे जनावरे मृत अन् बारा घरांची पडझड; अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही फटका

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजीत पवार यांनी शपथ घेतली. अजीत पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने अजीत पवार हे भविष्यात मुख्यमंत्री बनतील असे वक्तव्य केले जाते. त्यातच नागपुरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या सोमवारच्या समारोपीय कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सुर्यप्रताप साही यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच भविष्यात मुख्यमंत्री बनतील असे वक्तव्य केले. यावेळी मंचावर भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अरुणाचल प्रदेशचे कृषीमंत्री टागे टाकी, खासदार रामदास तडस, भाजपचे काही आमदार आणि इतरही काही नेते उपस्थित होते. या वक्तव्यानंतर कार्यक्रमात भाजपच्या एकाही नेत्याने याबाबत खुसाला केला नाही. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासह अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या अजीत पवार गटाच्या नेत्यांनीही चिंता वाढणार आहे. या वक्तव्यावर नागपुरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.

हेही वाचा : बुलढाणा : ‘‘पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने नसेल, प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील,” राष्ट्रवादीचे प्रसेनजीत यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाबाबत..

करोनाचा कठीन काळ सोडला तर नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शन भरवले जाते. नागपुरातील दाभा परिसरात संपन्न झालेल्या यंदाच्या प्रदर्शनात देशाच्या वेगवेगळ्या भागातील कृषि आणि कृषिवर आधारीत विविध जोड व्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत व्यवसायाची माहिती शेतकऱ्यांना दिली गेली. याप्रसंगी दूध, कापूस, सोयाबीन, ऊस या विषयावर अनेक कार्यशाळा झाल्या. या कार्यशाळेला विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची संकल्पना ही मुळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची आहे. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठीही ते खूप मेहनतही घेतात. या प्रदर्शनासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून त्यात वेगवेगळ्या संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असतो.