बिबट आणि उसाचे नाते एवढे घट्ट झाले आहे की आता बिबट्याला अधिवास म्हणून उसाचा मळा आवडायला लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात उसाच्या मळ्यातच बिबट्यांनी घर केल्याचे दिसून येत आहे. तर बिबट्यांची पिले देखील तेथेच ठाण मांडत आहेत. मात्र, बिबट्यांच्या या नव्या अधिवासामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत आहे. सोमवारी उसाच्या शेतात तोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्याच्या पिल्ले त्यांच्या आईजवळ सुरक्षित सोडण्यात आले.

कराड तालुक्यातील मौजे हिंगनोळे येथील शेतकरी विद्या माने यांच्या शेतात उसाची तोड सुरू होती. त्याचवेळी दुपारी एक वाजताच्या सुमारास बिबट्याची दोन पिल्ले त्याठिकाणी सापडली. वनपाल सागर कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने ते घटनास्थळी पोहोचले व पिल्लांना ताब्यात घेतले. ही नवजात पिल्ले होती आणि अजून त्यांचे डोळेही उघडायचे होते. त्यामुळे मादी बिबट जवळच असणार हे ओळखून कराड येथील वाईल्डलाईफ रेस्क्यूअर्सच्या चमुला पाचारण करण्यात आले. मादी बिबट आणि तिच्या पिल्लांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी पुढाकार घेतला. सायंकाळी साडेपाच वाजता त्यासाठीची व्यवस्था करुन दोन्ही पिल्लांना एका बास्केटमध्ये ठेवण्यात आले. ज्याठिकाणी ते सापडले होते, त्याचठिकाणी त्यांना ठेवून त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मादी बिबट आली आणि एका पिल्लाला अलगदपणे उचलून ती निघाली. त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या पिल्लासाठी ती साडेआठच्या सुमारास त्याठिकाणी आली व त्यालाही सुरक्षितपणे घेऊन गेली.

हेही वाचा… Maharashtra News Live: खोटं बोल पण रेटून बोल हे मोदी सरकार आणि भाजपाचं धोरण-उद्धव ठाकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनक्षेत्रपाल परिविक्षाधीन सुजाता विरकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह या मोहीमेत वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने सहभागी होते. तर वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कराडचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, अनिल कोळी, सचिन मोहिते,यांनी मोलाची भूमिका पार पाडली.