नागपूर: दक्षिण नागपुरात महावितरणने बेसा पॉवर हाऊस चौक ते म्हाळगी नगर दरम्यानच्या ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आधीच शुक्रवारपासून दोन दिवस रिंगरोडवरील वाहतूक व्यवस्थेत बदल झाला आहेत. त्यात आता इंदोरा उड्डाणपूल आणि लोहापूल रेल्वे रूळ कामामुळे आणखी दोन मार्गांवरील वाहतूकीत बदल होणार आहे. शहरातील तीन महत्त्वाच्या व्यस्त मार्गांवरील वाहतूक व्यवस्था प्रभावित होणार आहे. नागपूरकरांनी या मार्गावरून वाहतूक करताना काळजी न घेतल्यास मनस्ताप वाढून वाहन कोंडी होण्याचीही शक्यता आहे.

दक्षिण नागपुरातील बेसा पॉवर हाउस चौकाकडून जाणारी वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यात आता कॉटनमार्केट परीसरात इंदोरा दिघोरी उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. अशोक चौकातील नाग नदीच्या पोर्टल पिअर्सवर उल्टा बीम टाकला जात आहे. यासाठी ७०० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन बांधकामस्थळावर तैनात झाल्या आहेत. या कामाला ४८ तास लागण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेता गणेशमंदिर टी पॉईंटकडून गांधी गेटकडे जाणारी दोन्ही मार्गांवरची वाहतूक वळविण्यात आली आहे.

गणेश मंदिर टी पॉईंटकडून मॉडेल मिल चौक मार्गे अशोक चौकाकडील वाहतूक मॉडेल मील चौकातून बैद्यनाथ चौकाकडे वळविण्यात आली आहे. गांधी गेट चौकातून राम कुलर मार्गे अशोक चौकाकडील वाहतूक मॉडेल मिल, जाधव चौक मार्गे बैद्यनाथ चौकाकडे जाईल, अशोक चौकाकडून गांधी गेट मार्गावरील वाहतूक बैद्यनाथ चौक मार्गे आग्याराम मंदिराकडे वळविली जााईल.

महिनाभर कोंडीची शक्यता

अजनी रेल्वे विभागात सध्या ट्रॅकला लागून तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे रूळाचे काम सुरू आहे. पुढील तीन महिने हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे कॉटन मार्केट परिसरातला लोखंडी पूलाखालून जाणारी वाहतूक १९ जूलैपर्यंत रहदारीस बंद करण्यात आली आहे. मानस चौक ते कॉटन मार्केट चौकाकडे दोन्ही मार्गांनी होणारी वाहन कोंडी लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. मानस चौकाकडून लोखंडीपुलाकडे जाणारी नवी वाहतूक नव्या पुलाखालून जाईल. कॉटन मार्केट चौकाकडून लोखंडी पूल मार्गे मानस चौकाकडील वाहतूक कॉटन मार्केट चौकातून डावीकडे विजय आणि आनंद चित्रपटगृहामार्गे शनिमंदिर मार्गे वळविली जाणार आहे. विजय सिनेमागृहाकडून येणारी वाहतूक सरळ रेल्वे स्थानक रामझुला मार्गे वळविली जाईल.