यवतमाळ : भाजपाने बुधवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत यवतमाळ जिल्ह्यातून एकही पदाधिकारी नियुक्त झाला नाही. कार्यकारिणीत जिल्ह्यातील केवळ दोघांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. जिल्ह्यात भाजपाचे तब्बल विधानसभेत पाच आणि विधान परिषदेत एक असे सहा आमदार असताना राज्यात यवतमाळचे महत्त्व किती, हा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. यामुळे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

यवतमाळने २०१४ पासून भाजपाला भक्कम साथ दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातील असताना यवतमाळचे राजकीय महत्त्व जाणून प्रदेश कार्यकारिणीत येथून अनेकांना स्थान मिळेल ही अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातून एकही भाजपा नेता प्रदेश कार्यकारिणीत पदाधिकारी झाला नाही. यवतमाळमधून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आणि पुसद येथून डॉ. आरती फुफाटे यांना कार्यकारिणीत सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे प्रदेश भाजपाला जिल्ह्यातील जातीय समिकरणातही संतुलन राखता आले नाही, अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे.

हेही वाचा – धक्कादायक! चार वर्षांपूर्वी मृत व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेचे ‘व्हाउचर’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातून गेल्यावेळी प्रदेश कार्यकारिणीवर एकच सदस्य होता. त्यात यावेळी एकने वाढ झाल्याने दोन सदस्य कार्यकारिणीत आहेत. यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना विचारणा केली असता, पक्षाच्या नियमानुसार नियुक्त्या देण्यात येतात. प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून कोणीही पदाधिकारी नसले तरी जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार निमंत्रित सदस्य आहेत, असे भुतडा यांनी सांगितले. भाजपातील या नियुक्त्यांमध्ये चंद्रपूरला झुकते माप मिळाले असताना सहा आमदार असलेल्या यवतमाळला डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मात्र ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवता येत नसल्याने कार्यकर्त्यांची अवस्था दुखणे कोणास सांगावे, अशी झाली आहे.