वर्धा : स्मशानभूमीत ते पण पौर्णिमेस वास्तव्य करण्याचा प्रकार परंपरेने भीतीदायक म्हणल्या गेला आहे. भूतांचा वावर, पिशाच्च शक्तीचे आगमन अशी अंधश्रद्धा आहे. ती दूर करण्यासाठीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्मशानभूमीत उपक्रम ठेवते.जिल्हा व तालुका शाखेद्वारे आज, रविवारी अठ्ठाविसावा लोकजागर स्मशान होलिकोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदा ‘तेरवं’च्या निमित्ताने नाट्य व सिनेदिग्दर्शक हरीश इथापे यांची प्रकट मुलाखत आणि गप्पागोष्टींचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरवर्षीप्रमाणे स्थानिक स्मशानभूमीत होळीपौर्णिमेला सायंकाळी ७.३० वाजता हा लोकजागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेती, माती आणि स्त्रियांच्या सन्मानाचा जागर करणारा तेरवं हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत असून वैदर्भीय पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीबाबत दिग्दर्शक हरीश इथापे यांची संजय इंगळे तिगावकर, प्रवीण धोपटे व पल्लवी पुरोहित मुलाखत घेतील. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकही दिग्दर्शकाशी मुक्त संवाद साधणार आहेत. समाजमनातून भूतप्रेतांची अवास्तव भीती आणि स्मशानाबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन दूर सारण्यासाठी अठ्ठावीस वर्षांपूर्वी अ.भा.अंनिसद्वारे वर्ध्यात लोकजागर होलिकोत्सव सुरू करण्यात आला.

हेही वाचा…वर्धा : मदतीला धावले; पण काळाने केला घात, तिघांचा मृत्यू

प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमात आजतागायत गजलनवाज पं. भीमराव पांचाळे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्याम पेठकर, किशोर बळी, नितीन देशमुख, सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, राजेश खवले, ॲड. गणेश हलकारे, दिलीप सोळंके, अविनाश दुधे, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. राजा आकाश, जीवन चोरे, विद्याराज कोरे अशा अनेक मान्यवरांचा सहभाग राहिला आहे.

या होलिकोत्सवात ‘जादुई नगरी’ ही विदर्भस्तरीय जादूगारांची स्पर्धा, पेटत्या निखाऱ्यांवरून चालण्यापासून तर विविध प्रकारच्या चमत्कारांमागचे रहस्य उलगडणारे वैज्ञानिक प्रयोग, लोकजागर गीतमैफल, कविसंमेलन, कथाकथन, प्रबोधनात्मक पथनाट्ये, एकपात्री प्रयोग या सादरीकरणासोबतच पुस्तक प्रकाशन, ध्वनिमुद्रिकांचे विमोचन, देहदान करणाऱ्यांचा सत्कार, चळवळीतील सदस्यांचे वाढदिवस, असे अनेक सोहळे स्मशानभूमीवर साजरे झाले आहेत. 

हेही वाचा…चिमणीने केला मुंबई ते कझाकिस्तानचा प्रवास

महाराष्ट्रात वर्धेकरांची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या होलिकोत्सवात सुजाण नागरिकांनी, युवकयुवतींनी मित्रपरिवारासह सहभागी होण्याचे आवाहन अ.भा. अंनिसच्या युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, कार्याध्यक्ष प्रा. विद्या राईकवार, उपाध्यक्ष दादाराव मून, डॉ. धनंजय सोनटक्के, कोषाध्यक्ष संगीता इंगळे, सहसंघटक प्रशांत नेपटे, आकाश जयस्वाल, सहसचिव अजय इंगोले, महिला शाखेच्या जिल्हा संघटक डॉ. सुचिता ठाकरे, डॉ. सीमा पुसदकर, मुरलीधर बेलखोडे, प्रा. किशोर वानखडे, सुरेश राहाटे, प्रा. शेख हाशम, ॲड. के. पी. लोहवे, मनीष जगताप, तालुकाध्यक्ष प्रा. एकनाथ मुरकुटे, रवी पुनसे, डॉ. चंदू पोपटकर, युवा शाखेचे सचिव सतीश इंगोले, सहसंघटक तेजस्विनी क्षीरसागर यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.