वर्धा : गेली दोन दिवस झालेल्या पावसाने शेतातील कापूस व तूर पिके उद्ध्वस्त झाली आहे. पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हजारो हेक्टरवरील कापूस पिके काळी पडली, तर तूरही गळू लागली आहे. वेचलेला कापूस ओलाचिंब झाल्याने निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशा संकटकाळी मदतीची नितांत गरज. म्हणून शेतकऱ्यांना सरकारने गाजावाजा करीत पीक विमा काढण्याचे केलेले आवाहन आठवले. एक रुपयात विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे दार ठोठावले. पण प्रतिसादच मिळाला नाही. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीला आला आहे.

हेही वाचा : उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी संघटनेचे राज्य पदाधिकारी सतीश दाणी यांना यावेळी आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे. ते सांगतात की, मंगळवारी दिवसभर मी कंपनी कार्यालयाशी संपर्क केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. फोन उचलला जात नाही. थेट जायला मार्ग नाही. अनेकांची कार्यालये नागपुरात आहेत. मदत कशी मिळणार, याची चिंता सतावत आहे. कृषी खात्याने आता हस्तक्षेप करीत त्वरित पंचनामे केले पाहिजे. विम्याचा फायदा मिळायला नको का, असा सवालही दाणी यांनी केला. स्वतः त्यांचा साठ क्विंटल कापूस भिजल्याने खराब झाला. म्हणून ते विम्यासाठी धावपळ करीत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसोबतही घडतो आहे. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी अशा दुहेरी संकटाच्या खाईत शेतकरी लोटला गेला आहे.