वर्धा : घनदाट जंगलात, अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ओळख पटेना. अखेर एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची केलेली ही निर्घृण हत्या असल्याचे तपासात उघडकीस आले. तरुणीचा मृतदेह सापडला तेव्हा चांगलीच खळबळ उडाली होती. अखेर ते रहस्य उलगडले आहे.

घनदाट जंगल व महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध ढगा येथील जंगलात २२ मे रोजी एका तरुणीचा मृतदेह दिसून आला होता. तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे आर्वी व कारंजा परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. ही गंभीर घटना असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. वर्धा व लगतच्या जिल्ह्यातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू झाले. या तपासात सावंगी पोलीस ठाण्यात ९ मे रोजी येळकेळी येथील लक्ष्मी मानसिंग धुर्वे या तरुणीची हरविली असल्याची तक्रार दिसून आली. गुन्हे शाखेच्या चमुने मृत तरुणीची आणि हरविलेल्या तरुणीच्या अंगावरील कपडे, दागिने व चप्पल याची तपासणी सुरू केली. हे सर्व एकाच तरुणीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्याची खात्री नातेवाईक यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. प्रथम तांत्रिक माहिती व नंतर प्राप्त गोपनीय माहितीआधारे लक्ष्मी हिचा प्रियकर तिच्याच येळकेळी या गावचा दिनेश्वर वर्मा याला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू झाली.

आरोपी वर्मा याने मग कबुली देत घटनाक्रम सांगितला. त्याने ९ मे रोजी लक्ष्मीस ढगा जंगल परिसरात नेले. तिथे तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला. ही हत्या केली म्हणून वर्मा यास आज अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यामागील कारण अद्याप उघड झाले नाही. त्याची चौकशी कारंजा पोलीस करीत आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झालं होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल चव्हाण यांनी निर्देश देत कारवाई सुरू केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे शाखेचे विनोद चौधरी, उपनिरीक्षक उमाकांत राठोड, बालाजी लालपलवाले, अमोल लगड, राहूल इटेकर, पोलीस अंमलदार सुभाष राऊत, संतोष दरगुडे, नरेंद्र पारशर, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, राम ईप्पर, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, भूषण निघोट, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, राहूल अदवाल, संघसेन कांबळे आदींनी ही कारवाई केली.