वर्धा : गजबजलेल्या जागेत जर भव्य वास्तू साकारणार असेल तर त्याची चर्चा होणारच. आणि व्यापारी संकुल असेल तर मग उड्या पण पडणार. आता हेच वर्ध्यात होणार. वर्धा बाजार समितीची बजाज चौकात एकराने जागा पडली आहे. सध्या तिथे किरकोळ भाजी बाजार भरतो. मात्र या विस्तीर्ण जागेचा हवा तसा व सुयोग्य उपयोग होत नसल्याची खंत पण वर्धेकरांना आहे.
एक चांगला सुशोभीत बाजार याठिकाणी साकार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत असते. त्या भावनेची नोंद घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी खास बैठकच आज बाजार समिती कार्यालयात घेतली. नागपूरची मेट्रो रेल साकरण्याचा अनुभव गाठीशी असलेले व सध्या महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित व जिल्हाधिकारी वान्मथी सी. या सोबत होत्या.
या सर्वांनी प्रथम भाजी बाजारात फेरफटका मारला. भाजी विक्रेत्यांशी चर्चा करीत अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर बाजार समिती कार्यालयात संभाव्य वास्तूबाबत चर्चा झाली. शेतकरी, व्यापारी, अडते, अधिकारी यांच्याकडून अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. बाजारपेठेत पारदर्शी व्यवहार व्हावेत व आधुनिक तंत्रज्ञान मदतीने सुधारणा करण्याची बाब उपस्थित झाली. शेतकऱ्यांचे हित जपणे व कृषी व्यवसाय सक्षम करण्याचा हेतू असला पाहिजे, असे मत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी व्यक्त केले. त्यासाठी सकारात्मक पावले टाकल्या जातील, असे ते म्हणाले.
भाजी बाजाराच्या जागेवर मोठे व्यापारी संकुल उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे सभापती अमित गावंडे यांनी नमूद केले. भाजी बाजारासाठी किरकोळ विक्रेत्यांना गाळे देण्याची बाब प्राधान्याने घेण्यात आली. या नियोजित संकुलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पणनची मान्यता आवश्यक ठरते, असे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी नमूद केले. तेव्हा शासनाचे काय ते अपेक्षित सहकार्य देण्याची हमी डॉ. भोयर यांनी दिली.
या चर्चेत संचालक विलास मेघे, विशाल तिवारी, महेश भूतडा व सचिव समीर पेंडके तसेच गौरव मेघे यांनी काही सूचना केल्या. बाजार समितीच्या मुख्य परिसरात धान्यादी मालाची खरेदी विक्री चालते. साठवणूक पण केल्या जाते. त्याची माहिती घेत पालकमंत्री भोयर यांनी काही सूचना केल्यात. तसेच मदतीची हमी दिली. या नियोजित व्यापारी संकुलामुळे वर्धा शहरातील मुख्य भागाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता वाढली आहे.