वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटालाच मिळणार हे गृहीत धरून हालचाली सुरू झाल्या आहेत. तिकडे काँग्रेसचे नेते वर्धा काँग्रेस पक्षानेच लढावा म्हणून दिल्लीत तळ ठोकून बसले आहे. त्यामुळे वर्धा क्षेत्र आता आघाडीच्या राजकारणात वादाचा विषय ठरू लागत आहे. वर्धा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीला मिळणार म्हणून पक्षनेते शरद पवार यांनी माजी मंत्री तसेच बलाढ्य शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना कामाला लागण्याचे सांगितले.

पडत्या फळाची आज्ञा म्हणून देशमुख यांनी जिल्ह्यात संपर्क सुरू केला. साहेबांनी स्कायलॅब टाकला असे सांगत ते काँग्रेस नेत्यांना मदतीचे साकडे घालत सुटले. मात्र दुसरीकडे स्थानिक उमेदवार द्या असे जिल्हा राष्ट्रवादीने घोषा लावला. इतकेच नव्हे तर युवा नेते समीर देशमुख हे सक्षम उमदेवार असल्याचे शरद पवार यांना भेटून सांगितले. सात दिवसापूर्वी झालेल्या त्या भेटीत हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष ऍड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, आफताब खान, संदीप किटे व अन्य नेते होते. वर्धा जिल्ह्यातच उमेदवारी द्या. समीर किंवा तिमांडे हे चालतील. त्यावर पहिले एकमताने एक नाव द्या. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्राचा कानोसा घ्या. दुसरे म्हणजे पक्ष आर्थिक मदत करणार नाही. चर्चेसाठी पुन्हा भेटू, असे पवारांनी सांगितल्याचे बैठकीत उपास्थित एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा: …अन् शरद पवार म्हणाले, “राजकारण बाजूला ठेव…” नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज ही बैठक होणार होती. पण पवार व्यस्त असल्याने ही बैठक १२ मार्च नंतर शक्य असल्याचा निरोप शुक्रवारी रात्री मिळाला. समीर देशमुख यांनी यास दुजोरा दिला. वर्धेची जागा हक्काने मागून घेण्याचे एक कारण दिल्या जाते. राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा वर्धा जिल्ह्यातील पक्षाचे सर्व नेते झाडून शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहले. अजित पवार गटाला नावालाही नेता मिळाला नाही. विदर्भात इतकी भक्कम साथ अन्य एकाही नेत्याने ज्येष्ठ पवारांना दिली नाही. म्हणून जागा पक्षाला मिळत असेल तर आमचाच विचार करा, असा एकप्रकारे हट्टच यां नेत्यांचा आहे. दुसरे म्हणजे समीर देशमुख हे २००९ पासून लोकसभेची उमेदवारी मागत आहे. आज जर पक्षाला संधी आहे, तर उमेदवारी का नको, असे समीर देशमुख म्हणतात. एकूण आघाडीत दिसून येणारा लोकसभा लढण्याचा उत्साह चर्चेत आहे.