अकोला : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. वाशिम जिल्ह्यात योजनेंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येते. जिल्ह्यातील ४५ हजारावर महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा व्हावी यासह कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्याचा शासन निर्णय २८ जून २०२४ अन्वये मान्यता देण्यात आली. राज्य सरकारने अतिरिक्त अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अधिकृत घोषणा केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. योजनेच्‍या लाभासाठी अर्ज करण्‍याची मुदत ३१ ऑगस्‍टपर्यंत आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ होणार असून एक वि‍वाहित आणि एक अवि‍वाहित महिला असल्‍यास दोघींनाही लाभ मिळेल. योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्‍यास १५ वर्षांपूर्वीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्‍याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या पैकी एक ग्राह्य धरण्‍यात येणार आहे.

हेही वाचा: सोन्याच्या दरात वारंवार चढ- उतार, हे आहेत आजचे दर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परराज्‍यात जन्‍म झालेल्‍या महिलांनी महाराष्‍ट्रातील पुरूषाबरोबर विवाह केला असल्‍यास पतीचा जन्‍म दाखला, शाळा सोडल्‍याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्‍यात येईल. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला एक हजार ५०० रुपये प्रमाणे वर्षांला १८ हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. आतापर्यंत वाशिम तालुक्यातील दोन हजार ४४४, रिसोड तालुक्यातील एक हजार २४२, मालेगाव तालुक्यातील दोन हजार ३९१, मंगरुळपीर तालुक्यातील तीन हजार १८४, कारंजा तालुक्यातील २६ हजार ७६५, मानोरा तालुक्यातील दोन हजार ४०७, वाशिम शहरी भागातील एक हजार २४ असे एकूण ३९ हजार ४५७ ऑफलाइन अर्ज भरले आहेत. याशिवाय पाच हजार ९२९ ऑनलाइन अर्ज देखील भरण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५ हजार ३८६ अर्ज दाखल झाले आहेत. पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.