यवतमाळ : वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयालगत भव्य देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगव्या रंगाचा झेडा व त्यावर मनसेचे नाव व चिन्ह मुद्रित केल्याचे निवडणूक विभागाला आढळून आले. कार्यक्रमस्थळी पक्षाचे झेंडेही लावण्यात आले होते. हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका ठेवत या कार्यक्रमाचे आयोजक वैभव सुनील पुराणकर यांच्याविरुद्ध वणीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी वणी शहरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी कार्यक्रमस्थळी भव्य गडकिल्ल्याचा देखावा साकारण्यात आला होता. त्यावर आई तुळजाभवानी मातेची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती. निवडणूक विभागाच्या व्हिडीओ सर्वेक्षण पथकाचे प्रमुख जी. एन. देठे यांनी शिवजयंतीनिमित्ताने साकारण्यात आलेल्या देखाव्याचे चित्रीकरण केले.

हेही वाचा…आनंद वार्ता! निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय…

चित्रीकरणात किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या शिखरावर एक भगव्या रंगाचा मोठा झेंडा लावलेला असून त्या झेंड्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव व पक्षाचे चिन्ह दिसून आले. किल्ल्याचा शिखराच्या दोन्ही बाजूंनी झेंडे लावल्याचे व त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव व पक्षाचे चिन्ह आढळले. यासाठी कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी घेण्यात आली नसल्याचेही चौकशीत आढळून आले. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार वणी पोलिसात करण्यात आली. त्यावरून आयोजक वैभव पुराणकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिला गुन्हा ठरला आहे.