यवतमाळ : विदर्भात आज सोमवारी शाळांची घंटी वाजली. आजपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव किलबिलाटात साजरा होत असताना खासगी शाळांमध्ये मात्र शुकशुकाट होता. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होतानाच, जिल्ह्यात खाजगी संस्था संचालक मंडळाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनास १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून, विद्यार्थ्यांचे आणि संस्थांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना हवी. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासगी संस्था चालकांनी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या धोरणांमुळे खासगी शाळांसमोर निर्माण झालेल्या अडचणींविरोधात हा बंद होता, असे संस्था चालकांनी सांगितले.

शासनाकडून वेतनेतर अनुदानाच्या वाटपात होणारा विलंब होत आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षक पदे भरली जात नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. मान्यता, बदल्या व शैक्षणिक व्यवस्थापन प्रक्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या अनावश्यक अडथळ्यांमुळे संस्थांची कार्यक्षमता खुंटली आहे. शाळांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे होत असल्याचा आरोप खासगी संस्था चालकांनी केला आहे. शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व संस्था, शिक्षक या बंदमध्ये सहभागी झाले होते. हा बंद शासनाला दिलेला इशारा आहे. शासनाने त्वरित सकारात्मक पावलं उचलली नाहीत, तर भविष्यातील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचं राहील, असा इशारा खासगी संस्था चालकांनी दिला आहे. जिल्ह्यात आज शाळांचा बंद यशस्वी झाला, अशी माहिती यवतमाळ जिल्हा खाजगी संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष गणेश मोरे, सचिव अनिल गायकवाड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी शाळांमध्ये उद्या स्वागतोत्सव

आज सोमवारी सर्व शाळा सुरू झाल्या. त्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळा बंद असल्याची माहिती नसलेले अनेक विद्यार्थी खासगी शाळांमध्येही आले होते. आज खासगी शाळांनी बंद पुकारल्याने या शाळा शैक्षणिक नववर्षाचा पारंपरिक पहिला दिवस उद्या मंगळवारी २४ जून रोजी साजरा करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सत्रं, स्वागत गीतं, भेटवस्तू व संवाद यांच्या माध्यमातून नववर्षाचा प्रारंभ आनंददायी करण्याची तयारी प्रत्येक शाळेने केली आहे.