यवतमाळ : परदेशात विकसित शेतीविषयक तंत्रज्ञान व उत्पन्नात झालेली वाढ याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांना परदेश अभ्यासदौर्याची संधी मिळणार आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत आहे. मात्र, जाचक अटी व शर्तींमुळे परदेशातील या अभ्यासदौर्यापासून खरे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या आयोजनाचा अनुभव बघता, यात खरोखरच पात्र शेतकर्यांना संधी मिळणार की, लागेबांधे असणार्यांना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहे.
हेही वाचा : ‘भाजी खाया’, ‘अंडी खाया’… शालेय विद्यार्थ्यांची नवी ओळख संताप निर्माण करणारी
या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौर्याकरिता सर्व घटकांतील शेतकर्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल, ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा सातबारा व आठ ‘अ’ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकर्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी व तसे त्याने स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे. बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शेतकर्याचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकऱ्याकडे वैध पारपत्र (पासपोर्ट) असावे, ही महत्वाची अट आहे. कुटुंबाचा गाढा ओढताना ओढाताण सहन करणारा कोणता शेतकरी आधीच स्वतःचा पासपोर्ट काढून ठेवेल, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रस्तावासाठी ३१ जानेवारी अंतिम तारीख आहे. या कालावधीत तीन सलग शासकीय सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने जाणीवपूर्वक तर ही मुदत दिली नसावी अशी शंका उपस्थित होत आहे.
हेही वाचा : अमरावती : मामाने केले १४ वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण; वैद्यकीय तपासणीनंतर…
शासकीय निमशासकीय सहकारी, खासगी, संस्थेत नोकरी करणारा, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार यांना अभ्यासदौर्याची संधी नाही. मात्र यापूर्वी सधन शेतकरी, राजकीय वजन असलेले कंत्राटदार, कृषी विक्रेते शेतकरी, अधिकाऱ्यांच्या जवळचे शेतकरी यांनाच या अभ्यासदौऱ्याची संधी मिळाल्याने, यावेळीसुद्धा याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “परदेश दौरा करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनुदानाच्या तपशीलाविषयी सविस्तर माहिती, शेतकरी निवडीची कार्यपद्धती, शेतकर्यांनी पाळावयाच्या अटी व शर्तीची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून घ्यावी”, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगितले.