नागपूर : राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपात तथ्य नाही, निवडणुकीच्या वेळी मतदार यादी जाहीर केली जाते. त्यावर हरकती घेण्यासाठी वेळ दिला जातो. महाराष्ट्रात एक लाख बुथवर यादी लावली होती. त्यावेळी काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी आक्षेप घेतलं नाही. निवडणूक झाल्यानंतर सात महिन्यांनंतर राहुल गांधी, आरोप करतात, अशी टीका भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. ज्या ठिकाणी भाजप निवडून येते त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आक्षेप घेते, असे बावनकुळे म्हणाले.

माझे राहुल गांधीला खुले आव्हान आहे. येणाऱ्या महापालिका, नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे त्यावेळी त्यांनी कार्यकर्ते कामाला लावावे, निवडणुका झाल्यावर आरोप करू नये, असे बावनकुळे म्हणाले. कामठी विधानसभा मतदारसंघात १७ हजार बूथ लावून नवीन फॉर्म भरण्यात आले. त्यामुळे ३४ हजार मतदार वाढले आहेत. मताची वाढ होणे म्हणजे मतदार यादी चुकीची होत नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.

महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढू

ज्या ठिकाणी निवडणूक लढताना घटक पक्षाच्या अडचणी असतील तेथे वाद निर्माण होईल. असे कोणी वागू नये, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. असे बावनकुळे म्हणाले.

माझ्या नावाने पैसे मागणाऱ्याच्या विरोधात तक्रार करा

माझ्या नावाने जो कोणी व्यक्ती, नातेवाईक पैसे मागत असेल अशा व्यक्ती विरोधात पोलिसात तक्रार करा, असे आव्हान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले निकम नावाच्या व्यक्तीने समाज माध्यमामार्फत शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

पंचनाम्याचे आदेश दिले

विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांची हानी झाली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहेत., असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. अमरावती, यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिली आहे व नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा सांगितले आहे, असे ते म्हणाले.