प्रभाग रचनेत टिकण्यासाठी भाजप, काँग्रेसकडे कल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार वॉर्डाचा एक प्रभाग झाल्याने स्वबळावर निवडणूक लढणे आणि स्पर्धेत टिकून राहणे हे अवघड काम असल्याने काही विद्यमान अपक्ष नगरसेवकांनी प्रमुख राजकीय पक्षांची साथ मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची खात्री झाल्यावर हे नगरसेवक त्या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात, त्यात माजी उपमहापौर आणि अपक्षाचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांचा समावेश असून त्यांचे भाजपसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. दुसरे अपक्ष किशोर डोरले यांनी काँग्रेसकडून अर्ज घेतला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यावेळी महापालिकेत अपक्ष आणि छोटय़ा राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रभाग रचनेमुळे चांगलीच अडचण झाली आहे. ६० ते ६५ हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात अपक्ष उमेदवारांना जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत संपर्क ठेवणे कठीण होणार आहे.

शिवाय सर्व प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांचा प्रचार हा एकत्रित होणार असल्याने अपक्षांना मात्र फारसे महत्त्व राहण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना प्रचार करताना अडचणी येण्याची शक्यता बघता काही अपक्ष सदस्यांनी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा किंवा संबंधित प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.महापालकेत भाजपच्या नेतृत्त्वाखालील नागपूर विकास आघाडीत काही अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचा समावेश आहे. परिणय फुके आणि सतीश होले हे अपक्ष आता अधिकृतपणे भाजपमध्ये आहेत.

माजी महापौर किशोर डोरले, माजी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सविता सांगोळे, रवींद्र डोळस, गोपीचंद कुमरे, मीना चौधरी, वंदना इंगोले, हरिश डिकोंडवार, राहुल तेलंग (बरिएम), भावना ढाकणे आणि राजू लोखंडे (भारिप बहुजन महासंघ), असलम खान, ईशरद नाहीद मो. जलील अन्सारी (मुस्लिम लिग) हे महापालिकेत अपक्ष आणि काही छोटय़ा पक्षाचे सदस्य आहेत. किशोर डोरले यांचे काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीमध्ये नाव आहे.

रवींद्र डोळस हे शांतीनगर प्रभागाचे नगरसेवक असून सध्या नागपूर विकास आघाडीमध्ये असले तरी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल याची शक्यता कमी आहे. शिवाय त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे त्यामुळे ते शेजारच्या प्रभागातून उभे राहण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांना कुठल्यातरी राजकीय पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे.

केंद्र, राज्य आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने स्वाभाविकपणे अपक्षांचा कल याच पक्षाकडे अधिक आहे. मात्र, अशा इच्छुकांना विरोध करण्याची भूमिका भाजप निष्ठावंतानी घेतल्याने पक्षश्रेष्ठींची अडचण झाली आहे. भाजपने नकार दिला तर दुसरा पर्याय काँग्रेसचा आहे.

मात्र, तेथील स्थानिक कार्यकर्ते काय भूमिका घेतात यावर सर्व अवलंबून आहे. अपक्ष नगरसेवक पुन्हा निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर काँग्रेसकडून त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent corporator way to major political parties in nagpur
First published on: 21-10-2016 at 02:17 IST