नागपूर : भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण राज्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून अनेक ठिकाणी मूसळधार पाऊस कोसळला आहे. तर आता हवामान खात्यानेच आणखी काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने कोकण किनारपट्टीसह पुणे सांगली, सातारा व मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातही जोरधारा सुरूच आहेत.
अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तळ कोकणासह मुंबई व उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचे अलर्ट देण्यात आलेत. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. दरम्यान अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्या असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना पावसाचे तीव्र इशारे देण्यात आलेत. मध्य महाराष्ट्रात मात्र पुढील चार दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. त्याचवेळी घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने आज २२ जुलैला पावसाचा अलर्ट दिला आहे. यानुसार मुंबई व उपनगरासह ठाणे ,पालघर तसेच संपूर्ण कोकणपट्टी याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचे ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चार दिवस पावसाचे
रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर घाटामाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, घाटमाथा, धाराधिव, लातूर, नांदेडसह अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व पुणे घाटमाथ्यावर २३ जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट दिला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर २४ जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथासह वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा येथे येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, भंडारा, पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाथा येथे २५ जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, संपूर्ण विदर्भ, हिंगोली, नांदेड याठिकाणी येलो अलर्ट दिला आहे.