नागपूर, ग्वालियर येथे संशोधन केंद्र
नागपूर : भविष्यात आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध होतील. त्यापैकी आण्विक युद्धाचा सामना सोपा आहे. पण, जैविक आणि रासायनिक युद्ध कठीण आहे. त्यामुळे भारताने हे दोन्ही युद्ध लढण्याची तयारी चालवली आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थे (डीआरडीओ)ने ग्वालियर आणि नागपुरातील प्रयोगाळेत त्यासंदर्भातील संशोधन केले असून या युद्धाचे भविष्यातील संकट टाळण्यासाठी भारत सज्ज आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे संचालक मनमोहन परिदा यांनी दिली.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. युक्रेनच्या युद्धादरम्यान ‘डर्टी बॉम्ब’चा उल्लेख झाला. अशा स्थितीला समोर जाण्यासाठी भारताची काय तयारी आहे, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, करोना विषाणू हा प्रयोगशाळेत तयार करून त्याद्वारे युद्ध केले जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या जैविक युद्धासाठी आपल्या देशाने तयारी सुरू केली आहे. डीआरडीओच्या प्रयोगशाळेत त्यासंदर्भात सर्व तयारी केली जात आहे. एवढेच नव्हे तर रासायनिक युद्धासाठी देखील आपली सज्जता आहे. डीआरडीओच्या प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून रासायनिक युद्धाचा धोका टाळण्याच्या सर्व उपायोजना झाल्या आहेत. सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला. आता करोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार करून जैविक हल्ला केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>> नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले
भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर
या पत्रकार परिषदेला डीआरडीओचे महाव्यवस्थापक (तांत्रिक व्यवस्थापन) एच.बी. श्रीवास्तवही उपस्थित होते. ते म्हणाले, ‘गन ऑन ड्रोन’ प्रकल्प यशस्वी झाला आहे. आवश्यकतेनुसार त्यावर बंदूक लावण्याची सोय आहे. शिवाय सर्वांत लांबचा मारा करण्याची क्षमता असलेली तोफ सुसज्ज आहे. सैन्यदलाच्या मूल्यांकनानंतर तिला अंतिम स्वरूप दिले जाईल. आता बंदूक, तोफ किंवा रडार अशा प्रत्येक उपकरण, साहित्य, शस्त्रामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर केला जात आहे.