अमरावती : दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागातील भिकनूर-तळमडला-अक्कनपेट या सेक्शनमध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना फटका बसला असून ३० ऑगस्टला नरखेडवरून सुटणारी १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय २९ ऑगस्टला धावणारी १७६४१ काचिगुडा नरखेड ही एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. २९ ऑगस्टला ०७१८९ नांदेड-धर्मावरम, ३१ ऑगस्टला ०७१९० धर्मावरम-नांदेड, २९ ऑगस्टला ७७६०५ काचिगुडा-पूर्णा या एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे या भागातील रेल्वे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. रेल्वे रूळांवर पाणी साचलेले असल्याने अनेक गाड्यांना आपले मार्ग बदलावे लागले आहेत. काही गाड्या या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
२७ ऑगस्टला भगती की कोठी येथून सुटलेल्या १७६०६ भगत की कोठी-काचिगुडा एक्स्प्रेस ही नियोजित मार्गाऐवजी निजामाबाद-आरमूर-करीमनगर-पेडापल्ली बायपास-काझीपेट, मौला अली जी-काचिगुडा या बदललेल्या मार्गावरून धावणार आहे. २८ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटलेली मुंबई-लिगमपल्ली एक्स्प्रेस ही निजामाबाद- आरमूर-करीमनगर-पेडापल्ली बायपास-काझीपेट या बदललेल्या मार्गावरून धावत आहे. कामारेड्डी, अकानापेट, मिर्झापल्ली, बोलाराम हे थांबे वगळण्यात आले आहेत.
२८ ऑगस्टला सुटलेली काचिगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस ही काचिगुडा-मौला अली जी- काझीपेट-पेडापल्ली बायपास-करीम नगर-निजामाबाद या बदललेल्या मार्गावरून धावत आहे. २९ ऑगस्टला सुटणारी लिगमपल्ली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस ही सिंकदराबाद-काझीपेट-पेडापल्ली बायपास-करीम नगर-आरमूर-निझामाबाद या बदललेल्या मार्गावरून धावणार आहे. या गाडीचे सिंकदराबाद-निझामाबाद दरम्यानचे सर्व थांबे वगळण्यात आले आहेत.
२९ ऑगस्टला सुटणारी १२७९४ निझामाबाद-तिरूपती रायलसीमा एक्स्प्रेस, ३० ऑगस्टला सुटणारी ७७६१३ पूर्णा-अकोला एक्स्प्रेस, ७७६१४ अकोला-परळी वैजनाथ एक्स्प्रेस, ३१ ऑगस्टला सुटणारी ७७६१५ परळी वैजनाथ-आदिलाबाद एक्स्प्रेस, ७७६१६ आदिलाबाद-पूर्णा एक्स्प्रेस, ०७२८१ पूर्णा-जालना डेमू, १ सप्टेंबरला सुटणारी ७७६१९ जालना-नागरसोल, ७७६२० नागरसोल-जालना एक्स्प्रेस, ०७२८२ जालना-नांदेड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
२ सप्टेंबरला सुटणारी नांदेड-मेडचल एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. २९ ऑगस्टला सुटणारी १७६८४ पूर्णा-अकोला आणि ३० ऑगस्टला सुटणारी १७६८३ अकोला-पूर्णा एक्स्प्रेस धावणार नाही. ३० ऑगस्टला अकोला ते अकोट दरम्यान धावणाऱ्या सहा डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३० ऑगस्टची मनमाड-काचिगुडा अजंता एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. वाहतूक बदलाचा फटका प्रवाशांना बसला आहे.