लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
नागपूर : नोबेल पुरस्कार विजेत्यांना भेटणे, त्यांचे मार्गदर्शन लाभणे, जागतिक दर्जाच्या संशोधनांची ओळख होणे ही शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाची इच्छा असते. ही संधी नागपुरात होणा-या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ विज्ञान मेळाव्यात उपलब्ध होऊ शकते. हा सोहळा संशोधकांसाठी पर्वणीच ठरेल, असे मत ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’चे स्थानिक सचिव डॉ. जी.एस. खडेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. खडेकर यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मधील अनुभव आणि आयोजनासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. मेळाव्याच्या निमित्ताने गणित, रससायनशास्त्र, वैद्यकीय, कृषी, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रातील संशोधनांना जाणून घेता येईल. त्यांचा अभ्यास करण्याची संधी ५० वर्षांनंतर नागपूरकर आणि वैदर्भीयांना मिळणार आहे.
‘भारतीय विद्यार्थी आणि जनमानसात विज्ञान विषयाची लोकप्रियता वाढवण्यासाठी २०१४ मध्ये दोन ब्रिटिश वैज्ञानिकांनी याची सुरुवात केली होती. पहिली सायन्स काँग्रेस ही कलकत्ता येथे झाली. त्यानंतर १९२० आणि १९४५ ला नागपूर शहरात आयोजन झाले होते. नागपूर विद्यापीला १९७४ ला ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे यजमानपद मिळाले होते. त्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते उद्घाटन झाले होते. आता तब्बल ५० वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आयोजनाची संधी मिळाली आहे. सायन्स काँग्रेसला देशातील किमान आठ ते दहा नोबेल पुरस्कार विजेते भेट देतात. पंतप्रधानांच्या हस्ते सायन्स काँग्रेसचे उद्घाटन होत असून यावेळी नोबेल पुरस्कार विजेत्यांचा सत्कारही केला जातो. नाेबेल पुरस्कार विजेत्यांना भेटणे, त्यांचे भाषण ऐकणे ही विज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत मोठी गोष्ट असते. केवळ तेच नाही तर देश-विदेशातील नामवंत संस्थांचे संचालक, प्रतिष्ठित वक्ते, संशोधक या सायन्स काँग्रेसमध्ये भेट देतात. त्यामुळे अशा नामवंतांना एकाच व्यासपीठावर येतात,असे खडेकर यांनी सांगितले.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये काय असेल?
‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये वेगवेगळ्या चौदा विषयांचा समावेश असून प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र सभागृह राहणार आहे. येथे त्या विषयाच्या प्रमुख वक्त्यांचे भाषण होणार असून त्यांची निवडही ‘इस्का’ करते. याशिवाय अन्य सात छोट्या सायन्स काँग्रेसही येथे होणार आहेत. त्यामध्ये चिल्ड्रन सायन्स, वूमन सायन्स यांचा समावेश असेल. चिल्ड्रन सायन्स काँग्रेससाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून १४ ते १८ या वयोगटातील देशातील ११० नवसंशोधकांना आमंत्रित केले जाते. वमून सायन्स काँग्रेसमध्ये सामाजिक क्षेत्रातील नामवंत महिलांना बोलावण्यात येणार आहे. याशिवाय ८० बाय ४० इतक्या मोठ्या आकाराचे आठ स्टॉल लागणार असून येथे संरक्षण क्षेत्रासह अन्य मॉडेल बघता येणार आहेत.
विद्यापीठाचा कायापालट होणार
सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने विद्यापीठातील पायाभूत सुविधांची उभारणी, नवे सभागृह, विभागांचा विकास केला जाणार आहे. तसेच विद्यापीठाच्या इतिहासातही याची नोंद होणार असल्याचा विश्वास डॉ. खडेकर यांनी व्यक्त केला.
