नागपूर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठे कर लावण्याचे घोषित केले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप थेट भाष्य केले नाही. दरम्यान पंतप्रधानांनी नुकतेच स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन एका कार्यक्रमात केले होते. त्याला प्रतिसाद देत भारतातील कॅट या व्यापारी संघटनेने ८ ऑगस्टला नागपुरात एक उपक्रमाची घोषणा केली.

व्यापाऱ्यांच्या या उपक्रमात स्वदेशी जागरण मंचही सहभाग घेणार आहे. या विषयावर कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण भारतीय म्हणाले की, भारताला समृद्ध, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी आणि प्रेरणादायी राष्ट्र बनवण्यासाठी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घपण्याची गरज आहे. या महान मोहिमेच्या धर्तीवर, टीम कॅट नागपूर आणि स्वदेशी जागरण मंच यांच्यासोबत ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता नागपुरातील गांधी सागर येथील टिळक पुतळा चौकात परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये व्यापाऱ्यांसह ग्राहकाचीही उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान कॅट व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच संसदेला भेट दिली होती. त्यात देशभऱ्यातील १५० प्रमुख व्यावसायिक नेत्यांचा समावेश होता. संसद सदस्य आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होती. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद संकुलातील त्यांच्या बैठकीच्या खोलीत कॅट व्यापाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बिर्ला म्हणाले, व्यापारी आणि व्यापार हे देशाचा कणा आहेत. व्यापारी केवळ रोजगार निर्माण करत नाहीत तर देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. बदलत्या आर्थिक वातावरणाला लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना त्यांचा स्तर वाढवावा लागेल. आपण सर्वांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुन्हा सांगितला आणि म्हटले की व्यापाऱ्यांनी आता देशाच्या आणि स्वतःच्या हितासाठी स्वदेशी वस्तू विकल्या पाहिजेत आणि खरेदी केल्या पाहिजेत.

लोकसभा अध्यक्ष व कॅटचे म्हणणे काय?

लोकसभा अध्यक्षांनी उपस्थित व्यापाऱ्यांना आश्वासन दिले की जर व्यापार आणि व्यापाऱ्यांशी संबंधित मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणले गेले तर ते संसदेत चर्चेसाठी शक्य तितके व्यापाराशी संबंधित विषय आणण्याचा प्रयत्न करतील. यावेळी कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, देशातील व्यापारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ‘भारतीय वस्तू खरेदी आणि विक्री’ करण्याच्या त्यांच्या आवाहनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. त्यानुसार १० ऑगस्टपासून देशभरात स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली जाईल. ही मोहीम भारताचा आर्थिक स्वाभिमान मजबूत करेल आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.