नागपूर: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी कशापद्धतीने राजकीय खेळी खेळल्या जातात हे मागील पाच ते सहा वर्षांत संपूर्ण देशाने पाहिले आहे. पक्ष आणि विचारधारा या दोन्ही गोष्ट बाजूला ठेऊन अनेक पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मात्र, इंदिरा गांधींनी ऑफर दिल्यावरही रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांनी मुख्यमंत्री पद नाकारल्याची माहिती गवई यांचे पूत्र रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी दिली.

रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, रविवारी कमलताई संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाही, हे संघाचे षडयंत्र होते, असे वृत्त पुढे आले. यावरून वाद निर्माण झाला होता. यानंतर राजेंद्र गवई यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून कमलताई या संघाच्या कार्यक्रमाला नक्की जाणार. त्यांनी स्वतःही निमंत्रण स्वीकारलेले आहे, अशी माहिती दिली आहे. वैचारिक मतभेद असले तरी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींची मुख्यमंत्री पदाची ऑफर गवईंनी नाकारल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काळात अनेक बदल झाले. २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, अडीज वर्षांतच हे सरकार कोसळले. यानंतर शिवसेना फुटली आणि भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचाही वेगळा गट तयार झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे किती वलय आहे हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही इंदिरा गांधी यांनी ऑफर दिल्यावरही रा.सू. गवई यांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिल्याचा दावा राजेंद्र गवई यांनी केला.

राजकीय संबंधांवर गवई काय म्हणाले?

रा.सू. गवई यांचे अनेकांचे पक्षविरहित संबंध होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जवळचे संबंध होते. विचारधारा वेगळी राहिली तरी कार्यक्रमात जायला हवे. कार्यक्रमाला गेलो म्हणजे विचारधारा बदलेल असे नाही. रा.सू. गवई यांचे सगळ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. असे फसवे संदेश समाज माध्यमांवर लिहले गेले. मात्र हे सगळे खोटे आहे. इंदिरा गांधींनी त्यावेळी गवई यांना काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू, अशी ऑफर दिली होती. २०१४ मध्ये काँग्रेस नेत्या सोनीया गांधी यांनी आता २०१९ मध्ये काँग्रेचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी मला खासदारकीची ऑफर दिली. काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची विनंती केली होती, असा खुलासाही राजेंद्र गवई यांनी केला. गवई परिवाराने कधीही विचारधारा सोडली नाही. त्यामुळे व्यक्तीगत संबंध आणि विचारधारा वेगळी आहे. गवई परिवाराचे यापूर्वी पक्ष विरहित संबंध राहिलेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये संबंध होते. त्यामुळेच आईने संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याशी रा.सू. गवई यांचे भावासारखे संबंध होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.